अमृता फडणवीसांची सायकलस्वारी!:पर्यावरण संवर्धनासाठी मोठे पाऊल, दैनंदिन कामांसाठी सायकल वापरण्याचा निर्धार; VIDEO
![]()
आपल्या गाण्यांनी आणि विविध सामाजिक उपक्रमांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या अमृता फडणवीस यांनी आता पर्यावरण संरक्षण आणि आरोग्याच्या दृष्टीने एक अत्यंत कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. भारत सरकारच्या इंधन बचत मोहिमेतून प्रेरणा घेत त्यांनी आपल्या जीवनशैलीत एक महत्त्वपूर्ण सकारात्मक बदल केला असून, आता घरापासून 5 ते 7 किलोमीटरच्या परिसरातील दैनंदिन कामांसाठी त्यांनी थेट सायकलचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. अमृता फडणवीस यांनी नुकताच सोशल मीडियावर सायकल चालवतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना त्यांनी लिहिले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या इंधन बचतीच्या आवाहनाने प्रेरित होऊन, मी माझ्या घरापासून 5 ते 7 किलोमीटरच्या अंतरावरील सर्व कामांसाठी सायकल वापरण्यास सुरुवात केली आहे. पेट्रोल आणि डिझेलची बचत करण्यासाठी, तसेच निरोगी जीवनशैलीचा अंगीकार करण्यासाठी हे माझे एक लहान वैयक्तिक पाऊल आहे. कधीकधी, अर्थपूर्ण बदलांची सुरुवात ही साध्या आणि छोट्या निवडींमधूनच होते, असे त्यांनी म्हटले आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये अमृता फडणवीस सुरक्षेची योग्य ती काळजी घेत, डोक्यावर हेल्मेट परिधान करून घराबाहेर पडताना दिसत आहेत. ‘ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू’ या देशभक्तीपर गीताच्या पार्श्वभूमीवर, त्या अत्यंत आत्मविश्वासाने आणि तितक्याच आनंदाने मुंबईच्या रस्त्यांवरून सायकल चालवताना या व्हिडिओत पाहायला मिळत आहेत. नेटीझन्सकडून अमृता फडणवीसांचे कौतुक वाढते प्रदूषण आणि इंधनबचतीची गरज लक्षात घेऊन अमृता फडणवीस यांनी घेतलेला हा सायकल प्रवासाचा निर्णय अत्यंत कौतुकास्पद मानला जात आहे. त्यांच्या या कृतीचे सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर स्वागत होत असून, “त्यांचे हे पाऊल इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल,” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून दिल्या जात आहेत. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर, सायकल चालवणे हा आता केवळ व्यायामाचा भाग राहिला नसून ती काळाची प्रमुख गरज बनली आहे, हाच महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी या माध्यमातून अगदी प्रभावीपणे समाजाला दिला आहे.
