सतेज पाटील यांच्या बदनामीकारक बॅनर्समुळे काँग्रेस आक्रमक:पुण्यात पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी
![]()
पुणे शहरात मागील दोन-तीन दिवसांपासून माजी गृहराज्यमंत्री सतेज (बंटी) पाटील यांच्याविरोधात बदनामीकारक मजकूर असलेले बेकायदेशीर बॅनर्स लावण्यात आले आहेत. पुणे शहर काँग्रेसने या प्रकारावर तीव्र आक्षेप घेतला असून, हा सतेज पाटील यांच्यासह काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा कट असल्याचा आरोप केला आहे. यामुळे शहरात तणाव निर्माण होऊन शांतता व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर, पुणे शहर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांची भेट घेतली. त्यांनी पाटील यांना लेखी निवेदन सादर करत, अशा समाजकंटकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. निवेदनात काँग्रेस शिष्टमंडळाने म्हटले आहे की, हे अनधिकृत बॅनर्स लावलेली ठिकाणे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या कक्षेत येतात. त्यामुळे पोलिसांनी तातडीने फुटेज तपासावे आणि बॅनर्स लावणाऱ्या मुख्य सूत्रधारांसह गुन्हेगारांचा शोध घ्यावा. आरोपींवर माजी राज्यमंत्र्यांची बदनामी करणे, राष्ट्रीय पक्षाच्या नावाचा गैरवापर करणे, शहराचे विद्रुपीकरण करणे आणि दंगलसदृश वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणे या गंभीर आरोपांखाली गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. काँग्रेस नेत्यांची अशाप्रकारे बदनामी कदापी खपवून घेतली जाणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, ज्येष्ठ नेते आणि वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी, पुणे (पश्चिम) शहराध्यक्ष दीप्ती चवधरी, गटनेते चंदूशेठ कदम, नगरसेवक सुनील शिंदे, प्रवक्ते भाऊसाहेब आजबे आणि पदाधिकारी मंगेश फाळके यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
