राज्यात लाळखुरकत लसीकरण मोहिम-9 ची जय्यत तयारी:1.19 कोटी लस मात्रा उपलब्ध होणार, 20 नवीन कोल्ड-रूम उभारल्या
![]()
राज्यात लाळखुरकत रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत लसीकरण फेरी-९ साठी पशुसंवर्धन विभागाने तयारी सुरू केली आहे. मे अखेरपर्यंत राज्याला १ कोटी १९ लाख लस मात्रा उपलब्ध होणार आहेत. लसींच्या सुरक्षित साठवणुकीसाठी आणि वितरणासाठी नियोजन सुरू असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे. या लसींचा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी नव्याने २० ‘वॉक-इन कोल्ड-रूम’ उभारण्यात आल्या आहेत. प्रत्येक शीतगृहात सुमारे ३ लाख लस मात्रा साठवण्याची क्षमता आहे. याशिवाय, सध्या अस्तित्वात असलेल्या शीतगृहांचाही पूर्ण क्षमतेने वापर केला जाणार आहे. आतापर्यंत लाळखुरकत लसीकरणाच्या ८ फेऱ्या यशस्वीपणे पूर्ण झाल्या आहेत. प्रभावी लसीकरणामुळे राज्यात अलीकडील काळात या रोगाचा उद्रेक आढळलेला नाही. सलग दोन वर्षे रोगप्रादुर्भाव न झाल्यास महाराष्ट्राला ‘लाळखुरकत रोगमुक्त’ दर्जा मिळण्याची शक्यता आहे. यामुळे दुग्ध, मांस आणि अंडी यांसारख्या पशुजन्य उत्पादनांच्या निर्यातीला चालना मिळू शकते. आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी जिल्ह्यानुसार लस साठवण क्षमता तपासून माहिती तातडीने सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ऑगस्ट २०२६ पासून प्रत्यक्ष लसीकरण मोहीम सुरू करण्यासाठी विभागाने तयारी सुरू केली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या विविध शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू, इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन सामाजिक न्याय विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह (नविन), गुणवडी ता. बारामती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह सासवड ता. पुरंदर व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतीगृह तळेगाव दाभाडे येथे प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता ७ वी नंतर शालेय शिक्षण, कनिष्ठ महाविद्यालय, बिगर व्यावसायिक तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय अनुसूचित जातीमधील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शासकीय वसतिगृह प्रवेश देण्यात येणारआहे. वसतिगृह प्रवेश हा प्रवर्गनिहाय आरक्षण व गुणवत्तेनुसार करण्यात येणार आहे. शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांना विनामूल्य निवास, आंथरूण-पांघरूण, भोजन सुविधा, पुस्तके, स्टेशनरी, विविध शैक्षणिक बाबींसाठी आर्थिक सहाय्य तसेच दरमहा निर्वाह भत्ता यासह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी https://hmas.mahait.org/ या संकेतस्थळावर जाऊन प्रवेशासंबंधित सूचना वाचून ऑनलाईन अर्ज भरावा, असे आवाहन वस्तीगृहाच्या गृहपालाकडून करण्यात आले आहे.
