नीट पेपरफुटी प्रकरणी शरद पवार गटाचे आंदोलन:सक्षणा सलगरांसह अनेक महिला पदाधिकारी मंत्रालयासमोर, पोलिसांनी घेतले ताब्यात
![]()
नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील अनेक आरोपी महाराष्ट्रातील असल्याने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी आज शरद पवार गटाच्या नेत्या सक्षणा सलगर यांनी अचानक मंत्रालय परिसरातआंदोलन केल्याने पोलिसांची काही काळ तारांबळ उडाली. यावेळी खबरदारी म्हणून पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली. सक्षणा सलगर यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज मंत्रालयावर धडक देत नीट विरोधात आंदोलन करण्यास सुरूवात केली. अचानक आंदोलक जमल्यानंतर पोलिसांनी त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी खबरदारी म्हणून पोलिसांनी सर्व आंदोलकांना पोलिस व्हॅनमध्ये बसवले. तर दुसरीकडे आझाद मैदानावर क्लास चालकांचे आंदोलन सुरू आहे. नीट पेपरफुटी नंतर कोचिंग क्लासेस व्यवसायाची बदनामी होत असल्याचा म्हणत महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशनने आंदोलनास सुरवात केली आहे. NEET पेपरफुटी – CBI कडून आणखी दोघांना अटक तर दुसरीकडे NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात CBI ने बुधवारी आणखी 2 आरोपींना अटक केली. पहिल्या आरोपीचे नाव डॉ. मनोज शिरुरे असे आहे. ते लातूरचे रहिवासी आहेत. डॉ. मनोज यांनी एका कोचिंग सेंटरच्या मालकाच्या (जो स्वतःही आरोपी आहे) मुलासह 3 विद्यार्थ्यांना आरोपी पी.व्ही. कुलकर्णीकडून केमिस्ट्रीच्या प्रश्नपत्रिका मिळवून दिल्या होत्या. तर, दुसऱ्या आरोपीचे नाव तेजस हर्षदकुमार शाह असे आहे. तो पुणे येथील डॉ. अभंग प्रभू मेडिकल अकादमी (APMA) या कोचिंग सेंटरमध्ये फिजिक्सचा प्राध्यापक आहे. त्याला NEET UG 2026 परीक्षेतील फिजिक्सचे लीक झालेले प्रश्न अटकेत असलेल्या आरोपी मनीषा हवालदारकडून मिळाले होते. सीबीआय चौकशीत उघड झाले आहे की, नीटचा पेपर 5 राज्यांमध्ये विकला गेला होता. सर्वाधिक विक्री महाराष्ट्रात झाली आणि दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान आहे.
