जैन साध्वींच्या अपघाती मृत्यूची सखोल चौकशी व्हावी:अमरावतीतील जैन समाजाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

0
88abfd34-e3fd-472a-9c53-18f3e65929fb_1779809416136.jpg




मध्य प्रदेशातील रीवा येथे झालेल्या एका रस्ता अपघातात दोन जैन साध्वींचा मृत्यू झाल्याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे. अमरावतीतील जैन समाजाने मंगळवारी, २६ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. गेल्या २० मे रोजी रीवा येथे हा भीषण अपघात घडला होता. यामध्ये राष्ट्रसंत आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांच्या शिष्या आर्यिका श्रुतमती माताजी आणि उपशममती माताजी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे देशभरातील जैन समाजात संतापाची लाट पसरली आहे. ‘वात्सल्य फाउंडेशन’ आणि ‘दिगंबर जैन महासमिती’तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात, अपघाताची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तात्काळ व कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, जैन साधू-साध्वींच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या प्रकरणात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संबंधित पोलीस प्रशासनाने वैयक्तिक लक्ष घालून तातडीने न्याय द्यावा, अशी अपेक्षा समाजाने व्यक्त केली आहे. भविष्यात जैन साधू-साध्वी जेव्हा पदयात्रेवर (विहार) असतील, तेव्हा त्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने विशेष आणि ठोस उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे. जैन समाज प्रतिनिधी अभिनंदन पेंढारी यांनी सांगितले की, “जैन धर्मामध्ये साधू आणि साध्वींना अत्यंत पूजनीय स्थान आहे. ते अहिंसा, संयम, त्याग आणि मानवतेचा संदेश देत कोणत्याही वाहनाचा वापर न करता सतत पायी विहार करत समाजप्रबोधनाचे कार्य करतात. मात्र, अशा प्रकारे रस्ता अपघातात त्यांना जीव गमवावा लागणे अत्यंत चिंताजनक आहे.” निवेदन देताना संदीपभैया वैद्य, सतीश संगई, सजल जैन, अभिनंदन पेंढारी, मुकेश जैन, सचिन जैन, अनिल सुराणा, किशोर नखाते, संजय जैन, विनोद खडारे, विवेक फुलबरकर, चंद्रकांत मोदी, सचिन संगई, रुपेश राऊळ, शितल सिघवी, अविनाश आग्रेकर, विनोद जैन, नरेश जैन, सुधिर वालचाले, राजेंद्र बनोरे, प्रदीप आग्रेकर, सचिन जैन यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed