नशामुक्तीचा संदेश घराघरात पोहोचावा:मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे निर्देश; मुंबई शहर व उपनगरात मोहिमेला वेग

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-05-26t210439045_1779809742.jpg




नेस्को येथे ड्रग्सच्या सेवनामुळे घडलेल्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, कॅबिनेट मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी बृहन्मुंबई पालिका क्षेत्रात संपूर्ण वर्षभर नशा मुक्ती अभियान राबवण्यात येईल, अशी घोषणा केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेने गृह विभागाने शासन निर्णय जारी करून या संदर्भात उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून, मंगल प्रभात लोढा हे त्या समितीचे अध्यक्ष आहेत. आजची बैठक ही त्या उच्चस्तरीय समितीची पहिली बैठक होती. या बैठकीत नशा मुक्ती अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. २६ जून या जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याचे नियोजन करण्यात आले. यामध्ये शाळा, महाविद्यालये, गृहनिर्माण संस्था, व्यायामशाळा, स्पोर्ट्स क्लब तसेच मनपाच्या प्रभाग कार्यालय यासारख्या महत्वाच्या ठिकाणी २६ जून रोजी ऑनलाइन पद्धतीने एकाच वेळेस कार्यक्रम आयोजित करण्याचा समावेश आहे. या मोहिमेअंतर्गत वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून त्याचे मासिक वेळापत्रक देखील तयार करण्यात आले आहे. या मोहिमेत महानगरपालिका, महिला व बाल विकास विभाग, शिक्षण विभाग तसेच पोलीस प्रशासन यांचा सक्रिय सहभाग असणार असून, इतर सर्व विभागांचाही सक्रीय सहभाग राहणार आहे. शाळा व महाविद्यालयांमध्ये विशेष जनजागृतीसाठी पोस्टर्स, शॉर्ट फिल्म्स, पथनाट्य, जिंगल्स, गाणी तसेच विविध स्पर्धांचा वापर करण्यात येणार आहे. यावेळी मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात नशा मुक्ती अभियान प्रभावीपणे राबवले जात आहे. २६ जून हा केवळ एक दिवस नसून, समाजाला योग्य दिशेने नेण्याची जबाबदारी आठवण करून देणारा महत्त्वाचा क्षण आहे. विशेषतः युवकांमध्ये वाढत्या व्यसनाधीनतेच्या पार्श्वभूमीवर, शासन आणि समाजाने एकत्र येत नशामुक्तीचा संदेश घराघरात पोहोचवणे अत्यावश्यक आहे. आजच्या बैठकीस आंचल गोयल (मुंबई शहर जिल्हाधिकारी), सौरभ कटियार (मुंबई उपनगर जिल्हाधिकारी) तसेच संबंधित विभागांचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed