चंद्रभागा नदीत 35 फूट खोल ट्रक कोसळला:घुईखेडजवळ भीषण अपघातात चालकाचा चमत्कारिक बचाव
![]()
चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेडजवळ सोमवारी नागपूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात घडला. चंद्रभागा नदीवरील पुलाचा कठडा तोडून एक ट्रक थेट ३५ फूट खोल नदीपात्रात कोसळला. या अपघातात ट्रकचा चेंदामेंदा झाला असला तरी, चालकाला साधे खरचटलेही नाही, हे विशेष. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात इतका भीषण होता की, ट्रक पुलावरून खाली पडताना सुमारे ३५ फूट खोल नदीपात्रात आदळला. यामुळे ट्रकचे मोठे नुकसान झाले. घटनास्थळी काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी हा अपघात घडला, त्या नदीपात्र परिसरातच श्री संत बेंडोजी महाराज यांच्या संजीवन समाधीच्या पादुकांची आषाढी एकादशीला आरती केली जाते. त्यामुळे अनेक भाविक या घटनेकडे “बेंडोजीबाबांची कृपा” म्हणून पाहत आहेत. एवढ्या मोठ्या अपघातात चालकाला कोणतीही दुखापत न झाल्याने उपस्थित नागरिक आणि ग्रामस्थांना आश्चर्य वाटले. अपघातानंतर चालकाने स्वतः “माझा जीव वाचला, तो फक्त श्री संत बेंडोजी महाराजांच्या कृपेनेच” अशी भावना व्यक्त केली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक आणि भाविकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. अपघातानंतर स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत ट्रक बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. या घटनेमुळे पुलाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित विभागाने पुलाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. या चमत्कारिक बचावाची चर्चा सध्या संपूर्ण चांदूर रेल्वे तालुक्यात सुरू आहे.
