दाभा येथे बौद्धाचार्य श्रामणेरांचे जंगी स्वागत:ग्रामस्थांकडून दोन किलोमीटरपर्यंत पुष्पवृष्टी; बुद्धमय वातावरण

0
b723d407-c54f-42e9-9e8d-108dc7088c52_1779809779195.jpg




अमरावती जिल्ह्यातील दाभा येथे भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने आयोजित बौद्धाचार्य श्रामणेर शिबिरातील श्रामणेरांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. ग्रामस्थांनी तब्बल दोन किलोमीटरपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून पुष्पवृष्टी करत श्रामणेरांचा सत्कार केला. यावेळी श्रामणेर संघाला भोजनदानही देण्यात आले. या स्वागत सोहळ्यामुळे संपूर्ण गाव बुद्धमय वातावरणाने भारले होते. ‘सबका मंगल हो’, ‘बुद्धं शरणं गच्छामि’ आणि ‘जय भीम’ च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. महिलांनी पारंपरिक पद्धतीने श्रामणेरांचे पाय धुवून स्वागत केले, तर युवकांनी मोटारसायकल रॅली काढून आणि फटाके फोडून मिरवणुकीत सहभाग घेतला. गावातील मुख्य मार्गांवर पुष्प, निळे झेंडे आणि पंचशील धम्मध्वजांनी सजावट करण्यात आली होती. ग्रामस्थांनी श्रामणेरांप्रती आदर व्यक्त करत त्यांच्या धम्मप्रसाराच्या कार्याला सलाम केला. धम्मप्रसारासाठी घेतलेले श्रम, त्यांची शिस्तबद्ध जीवनशैली आणि समाजप्रबोधनाचे कार्य पाहून अनेकांनी समाधान व्यक्त केले. भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ केंद्रीय शिक्षक डॉ. युवराज मोरे यांनी यावेळी धम्म हा मानवता, समता आणि बंधुत्वाचा मार्ग असल्याचे सांगितले. समाजात वाढणारी अंधश्रद्धा, जातीयता आणि अन्याय दूर करण्यासाठी प्रशिक्षित धम्मकार्यकर्त्यांची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. श्रामणेरांनी गावात धम्मदेशनाद्वारे पंचशील, अष्टांगिक मार्ग आणि बुद्धांच्या मानवतावादी विचारांचा संदेश दिला. गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धम्मवंदना आणि धम्मसभेत सहभाग घेतला. दाभा गावातील या अभूतपूर्व स्वागत सोहळ्यामुळे श्रामणेरांचा उत्साह द्विगुणित झाला असून, धम्मप्रसाराच्या चळवळीला नवसंजीवनी मिळाल्याचे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रकाश बोरकर यांनी यावेळी प्रतिपादन केले. याप्रसंगी भन्ते नागसेन यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन प्रज्ञा धंदर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष भदंत आनंद (मदन खंडारे), दाभा शाखा अध्यक्ष शिला धंदर, इंदू चक्रे, रंजना टेंभुर्णे, सतीश गोपनारायण, मीना ढोके, अस्मिता मोहोड, कमला वानखडे, संबोधी बांबोडे, अर्चना उके आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed