हितेंद्र ठाकूर यांची भेट न घेताच एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना!:बविआ आणि शिवसेना शिंदे गटाच्या विलीनीकरणाच्या चर्चेला तूर्तास पूर्णविराम
![]()
विधानपरिषद निवडणुकांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांना पक्ष विलिनीकरणाचा प्रस्ताव देण्यात आला होता, ज्यानंतर कडू यांनी शिवसेनेत प्रवेश करत विधानपरिषदेची आमदारकी मिळवली होती. त्याच धर्तीवर आता पुन्हा एकदा विधानपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना, पालघरमधील नेते आणि बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनाही शिंदेंकडून पक्ष विलिनीकरणाची ऑफर देण्यात आल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती. या विलिनीकरणाच्या बदल्यात हितेंद्र ठाकूर यांना विधानपरिषदेवर संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात होते, मात्र अखेर ही बोलणी फिस्कटली असून विलिनीकरणाच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे आणि दुसरीकडे या घडामोडींनंतर ठाणे मतदारसंघातून विधानपरिषदेसाठी रवींद्र फाटक यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. हितेंद्र ठाकूर यांना न भेटताच एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची आज एक महत्त्वपूर्ण भेट होणार होती. या भेटीदरम्यान पक्ष विलिनीकरण आणि विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, हितेंद्र ठाकूर यांची कोणतीही भेट न घेताच एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाल्याने या सर्व राजकीय चर्चांना तूर्तास पूर्णविराम मिळाला आहे. दुसरीकडे, एकनाथ शिंदे दिल्लीला जाण्यापूर्वी माजी आमदार रवींद्र फाटक यांनी नंदनवन बंगल्यावर जाऊन त्यांची आणि त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांचीही भेट घेतली. या भेटींमध्ये ठाणे-पालघर विधान परिषद निवडणुकीच्या संदर्भात सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. या ताज्या घडामोडींमुळे आता या निवडणुकीत शिवसेनेकडून रवींद्र फाटक हेच उमेदवार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. तसेच, बहुजन विकास आघाडीच्या विलिनीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही आणि तशी कोणतीही चर्चा झाली नसल्याची स्पष्ट माहिती समोर येत आहे. रवींद्र फाटक यांनी घेतली हितेंद्र ठाकूर यांची भेट दरम्यान, माजी आमदार रवींद्र फाटक हे स्वतः विधान परिषद निवडणूक लढवण्यासाठी अत्यंत इच्छुक असून, त्यांनी नुकतीच वसईत जाऊन बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांची प्रत्यक्ष भेट घेतल्याने या निवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट निर्माण झाला आहे. या महत्त्वपूर्ण भेटीनंतर वसई-विरारमधील बहुजन विकास आघाडीचा संपूर्ण पाठिंबा शिवसेनेला मिळण्याची शक्यता अधिक बळकट झाली असून, आगामी काळात मतांची गोळाबेरीज वाढवण्यासाठी आणि ठाणे परिसरावर आपले वर्चस्व अबाधित राखण्यासाठी शिवसेनेने ही मोठी खेळी खेळल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम दरम्यान, बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर हे अचानक आपल्या खासगी गाडीने ठाण्याच्या दिशेने रवाना झाल्यामुळे अनेक राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले होते. ते एखाद्या वैयक्तिक भेटीसाठी जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असली तरी, सध्याच्या राजकीय वातावरणात ते ठाण्यात नेमकी कोणाची आणि कोणती मोठी राजकीय भेट घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. प्रहार संघटनेच्या विलीनीकरणानंतर आता पक्षाच्या विस्तारासाठी एकनाथ शिंदे यांनी बहुजन विकास आघाडीला दिलेल्या विलीनीकरणाच्या प्रस्तावाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती, मात्र आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
