अमरावतीत इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन:जयस्तंभ चौकात केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने

0
1989167e-dea6-4a93-acd9-9264d7eae623_1779810258698.jpg




अमरावती शहर काँग्रेस कमिटीने मंगळवार, २६ मे रोजी जयस्तंभ चौकात केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीविरोधात तीव्र निदर्शने केली. केंद्र सरकारने सलग चौथ्यांदा इंधनाच्या दरात वाढ केल्याने सामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. वाढत्या इंधन दरांमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून, महागाईचे भीषण संकट ओढवले असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अमरावती शहर काँग्रेसचे अध्यक्ष बबलू शेखावत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले. महिला काँग्रेस, युवक काँग्रेस आणि शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलकांनी दिलेल्या माहितीनुसार, सलग चार वेळा झालेल्या दरवाढीमुळे अमरावतीत पेट्रोलचे दर प्रति लीटर १०५ रुपयांवरून ११२ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत, तर डिझेलचे दर प्रति लीटर ९० रुपयांवरून ९८ रुपयांपर्यंत वाढले आहेत. आंदोलनादरम्यान माध्यमांशी बोलताना शहराध्यक्ष बबलू शेखावत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले, “संपूर्ण देश महागाईच्या आगीत होरपळत असताना देशाचे पंतप्रधान मात्र विदेश दौरे करण्यात आणि ‘मेलोडी’ चॉकलेटचा प्रचार करण्यात व्यस्त आहेत. सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा टाकणारे हे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे.” केंद्र सरकारच्या निष्काळजी आणि ढासळलेल्या आर्थिक कारभारामुळे आज संपूर्ण देशावर हे संकट आले आहे, असे आंदोलकांनी म्हटले. पेट्रोल आणि डिझेलच्या या दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढून दैनंदिन गरजेच्या वस्तू आणखी महागणार आहेत. ही दरवाढ अशीच सुरू राहिल्यास सर्वसामान्यांचे जगणे असह्य होईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. शहर काँग्रेसने ही अन्यायी इंधन दरवाढ त्वरित मागे घेण्याची मागणी केली असून, अन्यथा याहून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनात काँग्रेस शहराध्यक्ष बबलू शेखावत यांच्यासह मनपा विरोधीपक्षनेते विलास इंगोले, माजी महापौर मिलिंद चिमोटे, नगरसेवक विक्की वानखडे, युवक काँग्रेसचे निलेश गुहे, नितीन काळे, अनिकेत ढेंगळे, महिला काँग्रेस अध्यक्षा जयश्री वानखडे, प्रदेश उपाध्यक्ष भैय्या पवार, विनोद मोदी, राजेंद्र वर्मा, संजय चौधरकर, सलीम मिरावाले, अरुणकुमार जैस्वाल, माजी महापौर अशोक डोंगरे, अरुण बनारसे, संदेश सिंघई, शिल्पा राऊत, कांचन खोडके, शिरीन खान, जयश्री मरापे आणि किरण चांदवडकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शहरांसोबतच ग्रामीण भागातील नागरिकांनाही इंधन आणि घरगुती गॅस दरवाढीचा फटका बसला आहे. ग्रामीण भागात शेतीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात डिझेलचा वापर होतो. सध्या डिझेल महाग असून त्याचा तुटवडाही जाणवत आहे. ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनीही इंधन दरवाढीचा तीव्र निषेध नोंदवला असून, निकट भविष्यात ठिकठिकाणी आंदोलने होण्याची शक्यता वर्तवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed