अमरावती विधानसभेत 24 टक्के मतदारांचे एसआयआर मॅपिंग अपूर्ण:निवडणूक विभागाने चिंता व्यक्त करत तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन

0
158e62b1-e074-440c-9c7a-12c1aa4944fb_1779810933537.jpg




अमरावती विधानसभा मतदारसंघात अद्यापही २४ टक्के मतदारांचे विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मॅपिंग पूर्ण झालेले नाही. या स्थितीमुळे निवडणूक विभागाने चिंता व्यक्त केली असून, ज्या मतदारांचे मॅपिंग बाकी आहे, त्यांनी तातडीने आपल्या भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. मतदारयाद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रम २०२६ अंतर्गत अमरावती विधानसभा मतदारसंघात पूर्वतयारी सुरू आहे. या प्रक्रियेत नागरिकांची २००२ मधील मतदारयादी आणि सध्याची मतदार यादी यांची आपापसात मॅपिंग करण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. ज्या मतदारांचे बीएलओंकडून मॅपिंग पूर्ण झाले आहे, त्यांची ‘एसआयआर’ प्रक्रिया अत्यंत सोप्या आणि सुरळीत पद्धतीने पार पडेल. मात्र, ज्यांचे मॅपिंग झालेले नसेल, अशा मतदारांना या प्रक्रियेदरम्यान त्यांच्या जन्मतारखेच्या पुराव्यासाठी वेगवेगळी कागदपत्रे सादर करावी लागतील. हा अनावश्यक त्रास टाळण्यासाठी मतदारांनी स्वतःहून पुढाकार घेणे आवश्यक आहे. अनेक मतदारांची नावे मतदारयादीत दोन ठिकाणी असण्याची शक्यता असते. अशा मतदारांनी सध्या ते जेथे वास्तव्यास आहेत किंवा ज्या ठिकाणी त्यांना मतदानाचा हक्क हवा आहे, तेथील नाव कायम ठेवावे. तर दुसऱ्या ठिकाणचे नाव कमी करण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी किंवा संबंधित बीएलओंकडे ‘नमुना अर्ज क्रमांक ७’ सादर करावा, अशी सूचनाही देण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेत सुलभता आणि अचूकता आणण्यासाठी नागरिकांनी आपल्या बीएलओंची भेट घेऊन मॅपिंग प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनिल भटकर आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार विजय लोखंडे यांनी केले आहे. त्यांनी दुबार नावांच्या सुधारणेसाठीही सहकार्य करण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे, संपूर्ण जिल्ह्यात मॅपिंगचे काम सुरू असताना जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या अमरावतीमध्येच हे काम मागे पडले आहे. जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे येथील काम आदर्श स्थितीत असणे आवश्यक होते. परंतु नोंदी व्यवस्थित सापडत नसल्याने आणि येथील बीएलओ पाहिजे त्या क्षमतेने काम करत नसल्यामुळे अमरावतीच मागे पडली आहे. या स्थितीमुळे येथील प्रशासकीय कामकाजावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed