राज्यासह देशात चर्चा नांदेडच्या लग्नाची:नवरदेवाने रिटर्न गिफ्ट म्हणून गावातील सर्वांचा उतरवला प्रत्येकी 1 लाख असा 33 कोटींचा अपघात विमा

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-05-26t15_1779790053.png




आजच्या काळात लग्न म्हणजे लाखोंची उधळण, सोशल मीडियावर झळकणारा थाट व दिखाव्याची स्पर्धा असेच काहीसे चित्र आहे. मात्र नांदेडमधील एका कुटुंबाने या सगळ्या पारंपरिक चौकटी मोडत आपल्या मुलाच्या लग्नाला समाजहिताची वेगळीच किनार दिली. पाहुण्यांना महागडी भेटवस्तू देण्याऐवजी या कुटुंबाने संपूर्ण गावाच्या सुरक्षिततेची जबाबदारी उचलत असे काही केले, की त्यांच्या या अनोख्या निर्णयाचे आता राज्यभर कौतुक होत आहे. कंधार तालुक्यातील बहादरपुरा येथील सिद्धेश्वर पेठकर यांचा विवाह गत 20 मे रोजी संपन्न झाला. या लग्नाचे औचित्य साधत पेठकर कुटुंबाने सामाजिक भान राखत लग्नाला आलेल्या पाहुण्यांना नेहमीचे पारपंरिक आहेर किंवा भेटवस्तू देण्याऐवजी आपल्या गावातील प्रत्येक नागरिकाचा अपघात विमा उतरवला. या अनोख्या उपक्रमांतर्गत गावातील सुमारे 3,465 नागरिकांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचे अपघात विमा कवच देण्यात आले. अर्थात पेठकर कुटुंबाने संपूर्ण गावाची तब्बल 33.6 कोटी रुपयाची विमा पॉलिसी काढली. सिद्धेश्वर व त्यांचे मोठे बंधू अनूप पेठकर यांच्या संकल्पनेतून हा कौतुकास्पद निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे गावातील एकही पात्र नागरीक या सुविधेपासून वंचित राहू नये यासाठी पेठकर कुटुंबाने अत्यंत हुशारीने नियोजन केले होते. त्यांनी स्थानिक ग्रामपंचायतीच्या नावाने ग्रुप इन्शुरन्स पॉलिसी खरेदी केली. यासाठी गावातील मतदार यादीचा आधार घेण्यात आला. यामुळे विमा कंपनीकडे प्रत्येक गावकऱ्याची अचूक नोंद झाली. या कुटुंबाने एवढे मोठे कार्य केले. पण यावर नेमका किती खर्च झाला? हे सांगण्यास नकार दिला. नवरदेव व त्याचा भाऊ काय म्हणाला? नवरदेव सिद्धेश्वर पेठकर याविषयी बोलताना म्हणाले, आमच्या संस्कृतीत दान केल्याचे सांगितले जात नाही. त्याचा गाजावाही केला जात नाही. आम्हाला प्रसिद्धीची किंवा कौतुकाची हाव नाही. आमच्या या छोट्याशा प्रयत्नामुळे गावकऱ्यांचे भले व्हावे व त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावेत हीच आमची इच्छा आहे. नवरदेवाचे बंधू अनुप पेठकर म्हणाले, लग्नाचा आनंद केवळ आमच्यापुरता मर्यादित न राहता तो गावकऱ्यांच्या आयुष्यात सुरक्षितता आणणारा ठरावा. ग्रामीण भागात अनेकदा साप चावणे, अंगावर वीज पडणे किंवा इतर अनपेक्षित अपघातांमुळे मृत्यू होण्याच्या घटना घडतात. यामुळे गरीब कुटुंबांवर आभाळ कोसळते. माझ्या लहान भावाचे लग्न हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण होता. हाच आनंद द्विगुणित करण्यासाठी गावकऱ्यांसाठी काहीतरी ठोस व उपयुक्त करावे यासाठी आम्ही त्याचा विमा काढण्याचा निर्णय घेतला, असे ते म्हणाले. पेठकर कुटुंबाचे हे कार्य पाहून हे लग्न आमच्यासाठी अविस्मरणीय ठरल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली. विशेषतः बहादरपुराचे सरपंच बळीराम पेठकर यांनी संपूर्ण गावाला मिळालेल्या रिटर्न गिफ्टचे स्वागत केले. लग्नात गावकऱ्यांना अपघात विम्याचे कवच मिळण्याची कदाचित ही पहिलीच ऐतिहासिक घटना असावी, असे ते म्हणालेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed