पुणे मेट्रो कर्मचाऱ्यांनी १५ तोळे सोन्याची बॅग परत केली:प्रवाशाचा मौल्यवान ऐवज सुरक्षित, कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक
![]()
पुणे मेट्रो कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका प्रवाशाची १५ तोळे सोन्याचे दागिने असलेली हरवलेली बॅग सुरक्षितपणे परत मिळाली आहे. मेट्रो प्रशासनाच्या उत्कृष्ट समन्वय आणि कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही घटना पुणे मेट्रो स्थानकावर घडली. आरटीओ पुणे मेट्रो स्थानकावर एका प्रवाशाची बॅग बॅगेज स्कॅनिंग मशीनजवळ विसरली असल्याची माहिती पुणे रेल्वे स्थानक (पीआरएस) मेट्रो स्थानकातील स्थानक नियंत्रकांना फोनद्वारे मिळाली. या बॅगमध्ये अंदाजे १५ तोळे सोन्याचे मौल्यवान दागिने असल्याची माहिती देण्यात आली होती. माहिती मिळताच पीआरएस स्थानक नियंत्रकांनी तात्काळ सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आणि संबंधित महिला प्रवाशाची ओळख पटवली. दरम्यान, आरटीओ मेट्रो स्थानकावरील स्कॅनिंग मशीनजवळ तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना ती बेवारस बॅग आढळून आली. त्यांनी ती तात्काळ ताब्यात घेतली. बॅगेची तपासणी केली असता, त्यात प्रवाशाने सांगितल्याप्रमाणे अंदाजे १५ तोळे सोन्याचे दागिने सुरक्षित असल्याचे दिसून आले. यानंतर, पीआरएस स्थानक नियंत्रकांनी आरटीओ नियंत्रण कक्षाला बॅग मिळाल्याची माहिती दिली आणि संबंधित प्रवाशाशी संपर्क साधला. ही हरवलेली बॅग तृप्ती तारापुरे यांची होती. त्या पीआरएस ते पिंपरी-चिंचवड असा प्रवास करत होत्या. बॅग मिळाल्याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ पीआरएस स्थानक गाठले. मेट्रो प्रशासनाने आवश्यक ती सर्व खातरजमा आणि कायदेशीर पडताळणी पूर्ण केल्यानंतर, १५ तोळे सोन्यासह त्यांची बॅग सुरक्षितपणे त्यांच्या स्वाधीन केली. आपले मौल्यवान दागिने सुखरूप परत मिळाल्याबद्दल तृप्ती तारापुरे यांनी पुणे मेट्रोच्या सुरक्षा पथकाच्या प्रामाणिकपणाचे व तत्पर कार्यपद्धतीचे मनःपूर्वक आभार मानले. या कौतुकास्पद कामगिरीत पीआरएसचे स्थानक नियंत्रक अनिकेत रायभोळे, आरटीओ स्थानक नियंत्रक पांडुरंग चव्हाण, तसेच पीआरएस सुरक्षा पथकातील सुपरवायझर निलेश माने, सुरक्षा रक्षक बाळू विधाते आणि महिला सुरक्षा रक्षक संतोषी गोस्वामी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
