पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात 'आप'चा मोर्चा:महागाईविरोधात आंदोलन; पुणे मनपाला दिले ७ 'प्रति-आव्हाने'

0
d682c31c-f0a1-49f6-ae4d-aed2062b1e22_1779703243708.jpg




पुण्यात आम आदमी पार्टीने (आप) पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसच्या वाढत्या किमती तसेच महागाई व बेरोजगारीविरोधात सोमवारी अनोखे ‘बैलगाडी आंदोलन’ केले. ‘आप’च्या शिवाजीनगर येथील पक्ष कार्यालयापासून पुणे महानगरपालिका इमारतीपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली. ‘पेट्रोलचे भाव कधी कमी होणार? मेलोडी खावो, खुद जान जाओ’ आणि ‘महागाई कधी कमी होणार? मेलोडी खावो, खुद जान जाओ’ असे उपरोधिक घोषणा फलक हातात धरून पुणेकर नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. ‘आप’च्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पी भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला बचतीचे आवाहन केले असले तरी, सत्ताधारी जनतेच्या पैशांची उधळपट्टी करत असल्याचा आरोप पक्षाने केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर सत्ताधाऱ्यांनी केवळ एक दिवस बुलेट किंवा दुचाकीवर फिरून साधेपणाचा आव आणला, मात्र दुसऱ्याच दिवसापासून पुन्हा वाहनांचा ताफा आणि बडेजाव सुरू केला, अशी टीका आंदोलकांनी केली. सरकारी पैशांची उधळपट्टी थांबवण्यासाठी पुणे महानगरपालिकेने स्वतःपासून सुरुवात करावी, अशी मागणी करत आम आदमी पार्टीने पुणे महानगरपालिकेला ७ ‘प्रति-आव्हाने’ दिली आहेत. या आव्हानांमध्ये पुढील १ वर्ष कोणतेही भव्य शासकीय सोहळे, उद्घाटन किंवा भूमिपूजन सोहळे ऑनलाइन पद्धतीने आयोजित करणे, तसेच महापौर, नगरसेवक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दालन सजावटीवरील खर्च तात्काळ थांबवणे या मागण्यांचा समावेश आहे. याशिवाय, भाजपच्या महापौर आणि नगरसेवकांनी स्वेच्छेने आपले १ वर्षाचे वेतन व भत्ते सोडून द्यावेत, शक्ती प्रदर्शनासाठी आणि भव्य रॅलींसाठी होणारा अवाढव्य खर्च थांबवून तो पैसा लोककल्याणासाठी वापरावा, आणि अत्यंत आवश्यक असल्याशिवाय सरकारी खर्चाने होणारे विदेशी अभ्यास दौरे व शिष्टमंडळे पाठवणे बंद करावे, असेही ‘आप’ने म्हटले आहे. पुढील १ वर्ष नवीन सरकारी गाड्यांची खरेदी न करणे, व्हीआयपी ताफा थांबवून अधिकाऱ्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, सायकल किंवा कार पूलिंगचा वापर करणे, तसेच प्रशासनातून भ्रष्टाचार पूर्णपणे हद्दपार करण्याची शपथ घेऊन सर्वसामान्यांना तात्काळ सेवा देत भ्रष्ट अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करणे, ही प्रमुख आव्हाने पुणे महानगरपालिकेसमोर ठेवण्यात आली आहेत. या आंदोलनात ‘आप’चे प्रदेश उपाध्यक्ष विजय कुंभार, प्रदेश सचिव डॉ. अभिजीत मोरे, प्रदेश समन्वयक अमित म्हस्के, प्रदेश प्रवक्ते मुकुंद किर्दत, प्रदेश युवा अध्यक्ष रविराज काळे, प्रदेश संघटक संजय कोने, पुणे शहर अध्यक्ष सुदर्शन जगदाळे व धनंजय बेनकर, पुणे शहर महासचिव सुभाष कारंडे, सतीश यादव, ऋषिकेश कनवटे, एड. गणेश थरकुडे, विकी पासोटे, शुभम चव्हाण, ऋषिकेश मारणे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed