बुलढाण्यात इंधन टंचाई नियंत्रणात:घाबरून न जाता मशागतीची कामे सुरू ठेवा; जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-05-25t192017295_1779717082.jpg




राज्यातील काही भागांत निर्माण झालेल्या इंधन टंचाईमुळे पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र असताना, बुलढाणा जिल्ह्यातील परिस्थिती आता नियंत्रणात असल्याची दिलासादायक माहिती जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट करत, जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला सुरळीत इंधनपुरवठा करण्याची हमी प्रशासनातर्फे घेतली जात असल्याचे महत्त्वपूर्ण आश्वासनही दिले आहे. बुलढाणा जिल्ह्यात ज्या ठिकाणी इंधन टंचाई जाणवत आहे, तेथील महसूल अधिकाऱ्यांकडून माहिती मिळताच इंधन कंपन्यांशी संपर्क साधून प्रशासनाकडून तत्काळ इंधनपुरवठा केला जात आहे. या तात्काळ उपाययोजनांमुळे सध्या जिल्ह्यातील इंधन टंचाईची परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आली असून, इंधनाचा काळाबाजार करणाऱ्यांवरही प्रशासनाची करडी नजर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही टंचाईला न घाबरता आपली शेतीची आणि मशागतीची कामे विनाअडथळा सुरू ठेवावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी केले आहे. परभणीत पेट्रोल पंपांवर ‘नो स्टॉक’चे फलक परभणी जिल्ह्यात गेल्या 10 दिवसांपासून भेडसावणारी डिझेल टंचाई अद्यापही कायम असून, शहरातील बहुतांश पेट्रोल पंपांवर डिझेल संपल्याने थेट ‘नो स्टॉक’चे फलक झळकत आहेत. डिझेलच उपलब्ध नसल्याने पंपांवरील गर्दी ओसरली असून, वाहनधारकांना इंधनासाठी एका पंपावरून दुसऱ्या पंपावर वणवण भटकावे लागत आहे. या तीव्र टंचाईचा सर्वाधिक फटका ट्रॅक्टर, मालवाहू वाहने, खाजगी बसेस आणि जनरेटरवर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांना बसत आहे. प्रशासन आणि तेल कंपन्यांकडून इंधन पुरवठा सुरळीत करण्याचे दावे केले जात असले तरी, प्रत्यक्ष परिस्थितीत कोणतीही सुधारणा न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. बीड जिल्ह्यातही तीव्र इंधन टंचाई बीड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात, विशेषतः आष्टी तालुक्यात सध्या तीव्र इंधन टंचाई निर्माण झाली असून, याचा सर्वाधिक फटका खरीप हंगामापूर्वीच्या मशागतीच्या कामांना बसत आहे. मुबलक डिझेल मिळत नसल्याने ट्रॅक्टर शेतातच उभे असून शेतीची कामे पूर्णपणे खोळंबली आहेत. त्यातच आता नांगरणीसह इतर कामांसाठी ट्रॅक्टर चालकांनी डिझेल आणून देण्याची जबाबदारी थेट शेतकऱ्यांवरच टाकल्याने, पेट्रोल पंपांवर कॅन घेऊन शेतकऱ्यांच्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पूर्वी गॅस सिलिंडरसाठी रांगेत उभे राहावे लागायचे, तशीच वेळ आता डिझेल मिळवण्यासाठी तासन्‌तास रांगेत उभे राहून आल्याची हतबल प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed