नांदेड जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एचएलएल (HLL) मार्फत मोफत प्रयोगशाळा तपासणी सेवा पूर्ववत सुरू; नागरिकांनी व गरोदर मातांनी लाभ घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

0
ChatGPT-Image-May-25-2026-02_33_48-PM.jpg


नांदेड-  जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेला आणि विशेषतः गरोदर मातांना उत्तम आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नांदेड पूर्णपणे कटिबद्ध आहे. नुकत्याच एका स्थानिक वृत्तपत्रात हिमायतनगर तालुक्यातील सरसम व चिंचोर्डी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत महापॅथॉलॉजी लॅब (MahaLab) सेवा बंद झाल्याबाबत प्रसिद्ध झालेल्या बातमीची जिल्हा आरोग्य प्रशासनाने तात्काळ दखल घेतली असून, वस्तुस्थिती स्पष्ट करणारी सकारात्मक माहिती नागरिकांसाठी जाहीर करण्यात येत आहे.

शासकीय स्तरावरील काही तांत्रिक व वित्तीय कारणांमुळे तसेच १५ व्या वित्त आयोगाच्या निधी उपलब्धतेअभावी काही काळासाठी मे. एचएलएल लाईफकेअर लि. कंपनीची बाह्यस्त्रोत (Outsourced) प्रयोगशाळा सेवा तात्पुरती खंडित झाली होती. या संक्रमण काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर In-House (अंतर्गत) पद्धतीने प्रयोगशाळा तपासण्या करण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु आता वरिष्ठ स्तरावरून हा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागला आहे.

दिनांक ३ मे २०२६ पासून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये (PHC) मे. एचएलएल लाईफकेअर लि. (M/S HLL Lifecare Ltd) यांच्यामार्फत राज्यस्तरावरील नवीन करारानुसार प्रयोगशाळा तपासण्यांची सेवा पूर्ण क्षमतेने पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.या अंतर्गत नागरिकांना व गरोदर मातांना पूर्वीप्रमाणेच सर्व आवश्यक तपासण्या मोफत उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

 महत्त्वाचे मुद्दे:

१. २५ प्रकारच्या मोफत तपासण्या: नवीन करारानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर एकूण २५ प्रकारच्या अत्यंत महत्त्वाच्या प्रयोगशाळा तपासण्या (उदा. रक्त, लघवी व इतर आवश्यक चाचण्या) मोफत केल्या जात आहेत.

२. गरोदर मातांसाठी अखंडित सुविधा: ‘मानव विकास शिबिर’ व नियमित आरोग्य तपासणी अंतर्गत येणाऱ्या गरोदर मातांची रक्त व लघवी तपासणी आता पूर्णपणे विनामूल्य व विनाव्यत्यय सुरू करण्यात आली आहे.

३. खाजगी लॅबमध्ये जाण्याची गरज नाही: अधिकृत करारातील २५ प्रकारच्या नियमित चाचण्या प्राथमिक आरोग्य केंद्रातच मोफत उपलब्ध असल्याने, कोणत्याही वैद्यकीय अधिकाऱ्याने बाहेरील खाजगी लॅबसाठी स्पेशल टेस्ट प्रिस्क्राईब (शिफारस) करू नये, अशा कडक सूचना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आलेल्या आहेत. याचे उल्लंघन झाल्यास संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राचे देयक (Bill) अदा केले जाणार नाही व सर्व जबाबदारी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांची राहील.

तरी हिमायतनगर तालुक्यासह नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आणि गरोदर मातांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन या मोफत प्रयोगशाळा तपासणी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. संतोष सूर्यवंशी जिल्हा परिषद, नांदेड यांच्यातर्फे करण्यात येत आहे. 



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed