पुण्यात ‘ऑरेंज इकॉनॉमी’ एक्स्पोचे आयोजन:भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेचे भवितव्य उलगडणार, 30 व 31 मे रोजी
![]()
पुण्यात ‘क्रिएटिव्ह इंजिन एक्स्पो २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. ३० आणि ३१ मे रोजी गणेश कला क्रीडा मंच येथे हा एक्स्पो पार पडणार असून, यातून भारताच्या ‘ऑरेंज इकॉनॉमी’चे (सर्जनशील अर्थव्यवस्था) भवितव्य उलगडणार आहे. ‘सृजन कॉलेज ऑफ डिझाईन’चे संस्थापक संतोष रासकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेत पारंपरिक उद्योगांच्या जोडीला सर्जनशीलता आणि डिजिटल कौशल्यांचे महत्त्व वाढले आहे. ॲनिमेशन, गेमिंग, व्हीएफएक्स, डिजिटल डिझाईन आणि एआय यांसारख्या क्षेत्रांमध्ये सध्या मोठी आर्थिक उलाढाल होत असून, जागतिक जीडीपीमध्ये ‘ऑरेंज इकॉनॉमी’चा वाटा वाढत आहे. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला ‘पुणे-मुंबई एव्हीजीएक्सी -एक्सआर कॉरिडॉर’ या क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे पुणे शहराला देशाचे ‘क्रिएटिव्ह कॅपिटल’ बनण्याची मोठी संधी मिळणार असल्याचे तज्ज्ञांनी मत व्यक्त केले. या एक्स्पोमध्ये रिलायन्स ॲनिमेशन स्टुडिओ, रेड चिलीज व्हीएफएक्स, असेंबलाज स्टुडिओ आणि एनव्हिजन यांसारख्या देश-विदेशातील सुमारे ३५ नामांकित कंपन्या व स्टुडिओ सहभागी होणार आहेत. हे प्रदर्शन केवळ कला आणि तंत्रज्ञानाचा मेळावा नसून, भारतातील भविष्यातील गुंतवणुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. माजी खासदार प्रदीप रावत यांनी नमूद केले की, या क्षेत्रासाठी मोठ्या भांडवलाची गरज नसते; केवळ संगणक, इंटरनेट आणि कल्पकता यांच्या जोरावर ग्रामीण भागातील युवकही जागतिक पातळीवर काम करू शकतो. हा एक्स्पो सर्वांसाठी विनामूल्य खुला असून, नागरिक, विद्यार्थी, उद्योजक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पत्रकार परिषदेला आशिष कुलकर्णी (संचालक, आयआयसीटी), प्रशांत महाडीक (डायरेक्टर, शारदा बिज़नेस सोल्यूशन), निखिल हळ्ळी (डायरेक्टर, अरेना) आणि विनीता बच्छानी (डायरेक्टर, मोशन पिक्चर्स स्कूल) उपस्थित होते.
