होमिओपॅथीच्या विद्यार्थ्यावर भीक मागण्याची वेळ:नांदेडच्या तरुणावर मुंबईत हरवल्याने आली वेळ, पोलिसांच्या संवेदनशीलतेमुळे मायेची ऊब

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-05-23t10_1779513098.png




मुंबईतील मालाड परिसरात भिकाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी सुरू असलेल्या नियमित पोलिस मोहिमेदरम्यान एक हृदयस्पर्शी घटना समोर आली. रस्त्यावर भटकताना आढळलेला एक तरुण प्रत्यक्षात नांदेड जिल्ह्यातील वैद्यकीय शिक्षण घेणारा विद्यार्थी असल्याचे उघड झाले. मानसिक आरोग्याच्या समस्येमुळे कुटुंबापासून दूर गेलेल्या या तरुणाचा मालाड पोलिसांनी शोध घेऊन कुटुंबाशी संपर्क साधला आणि अखेर मालाड पोलिस ठाण्यात भावनिक पुनर्मिलन घडून आले. ही घटना गुरुवारी समोर आली. मालाडच्या एस. व्ही. रोड परिसरात पोलिसांचे पथक भिकाऱ्यांना ताब्यात घेऊन पुनर्वसनासाठी कारवाई करत होते. यावेळी पोलिस शिपाई कोमलसिंग जाधव यांच्या नजरेस वीस-पंचवीस वर्षांचा एक तरुण फुटपाथवर बसलेला दिसला. त्याची मानसिक अवस्था अस्थिर होती. तो नीट बोलू शकत नव्हता आणि कोणत्याही प्रश्नांची स्पष्ट उत्तरे देत नव्हता. त्याची अवस्था पाहून जाधव यांनी त्याला तात्काळ मालाड पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांनी दाखवली संवेदनशीलता सामान्य भिकाऱ्यांप्रमाणे केवळ औपचारिक कारवाई न करता मालाड पोलिसांनी संवेदनशीलता दाखवत त्या तरुणाची काळजी घेतली. त्याला आंघोळ करण्याची व्यवस्था करून देण्यात आली तसेच गरम जेवण देण्यात आले. काही वेळानंतर तो शांत झाल्यावर उपनिरीक्षक मनीषा कागलकर यांनी त्याच्याशी प्रेमाने संवाद साधण्यास सुरुवात केली. हळूहळू त्याने आपली माहिती सांगण्यास सुरुवात केली. त्या तरुणाने आपले नाव अभय असल्याचे सांगितले. तो नांदेड जिल्ह्यातील तामसा येथील रहिवासी असून होमिओपॅथीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असल्याचे त्याने सांगितले. काही महिन्यांपूर्वी तो रेल्वेने प्रवास करत असताना त्याची बॅग चोरीला गेली होती. त्या बॅगेत पैसे, कागदपत्रे आणि कुटुंबीयांचे संपर्क क्रमांक होते. मुंबईत आल्यानंतर त्याच्याकडे ना पैसे उरले ना कोणाशी संपर्क साधण्याचा मार्ग. उदरनिर्वाहासाठी भीक मागण्याची वेळ अभय आधीपासून मानसिक आरोग्याशी संबंधित आजारावर उपचार घेत होता. मानसिक तणाव आणि संपर्काची कोणतीही साधने नसल्याने तो पूर्णपणे गोंधळून गेला. कुटुंबीयांचे फोन नंबरही त्याला आठवत नव्हते. शेवटी उदरनिर्वाहासाठी त्याच्यावर भीक मागण्याची वेळ आली. अभयने दिलेल्या माहितीच्या आधारे उपनिरीक्षक मनीषा कागलकर यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक दुश्यंत चव्हाण आणि पोलिस उपायुक्त संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने नांदेड जिल्ह्यातील तामसा पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या वर्णनाशी मिळताजुळता एक तरुण बेपत्ता असल्याची तक्रार आधीच नोंदविण्यात आली होती. वडील शिक्षक, भाऊ डॉक्टर यानंतर कागलकर यांनी अभयच्या वडिलांशी दूरध्वनीवर संपर्क साधला. अभयचे वडील शिक्षक असून त्याचा मोठा भाऊ शासकीय रुग्णालयात डॉक्टर आहे. सुमारे दीड महिन्यांपूर्वी अभय कोणालाही न सांगता घरातून निघून गेला होता. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला होता. अभयचा कोणताही ठावठिकाणा मिळत नसल्याने कुटुंबीय चिंतेत होते. पोलिसांनी अभयचे छायाचित्र कुटुंबीयांना पाठवून खात्री करून घेतली. त्यानंतर अभयचे वडील आणि भाऊ तातडीने मुंबईकडे रवाना झाले. गुरुवारी रात्री 11 वाजता ते मालाड पोलिस ठाण्यात पोहोचले. अनेक दिवसांच्या शोधानंतर मुलाला समोर पाहताच अभयच्या वडिलांना अश्रू अनावर झाले. पोलिस ठाण्यातील वातावरण अत्यंत भावनिक झाले होते. अभयच्या कुटुंबीयांनी मालाड पोलिसांचे आभार मानले. केवळ पोलिसी कर्तव्य म्हणून नव्हे तर माणुसकीच्या भावनेतून दाखविलेल्या सहकार्यामुळेच अभय पुन्हा कुटुंबापर्यंत पोहोचू शकला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मालाड पोलिसांच्या संवेदनशीलतेमुळे एका कुटुंबाला त्यांचा हरवलेला मुलगा पुन्हा मिळाला आणि माणुसकीचे सुंदर उदाहरण समाजासमोर आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed