Maharashtra Weather Update | पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे! हवामान खात्याने ‘या’ भागांसाठी दिला सतर्कतेचा इशारा

0
Maharashtra-weather-Heatwave-and-Unseasonal-Rains.webp.webp


Maharashtra Weather Update | राज्यात मागील काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले होते. विशेषतः विदर्भ भागात तापमानाने उच्चांक गाठल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा इशारा जारी करण्यात आला होता. अशातच शुक्रवारी राज्यातील विविध भागांत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे.

पुणे (Pune) शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये शुक्रवारी प्री-मान्सून पावसाने दमदार उपस्थिती लावली. काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या तर काही भागांत मुसळधार पाऊस झाला. मागील काही दिवसांपासून ४० अंशांच्या पुढे गेलेल्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र दुपारनंतर वातावरणात अचानक बदल झाला आणि शहरात ढगाळ वातावरणासह थंड वाऱ्यांनी हजेरी लावली. अशातच हवामान विभागाने पुढील काही दिवस शहर आणि परिसरात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

हडपसर परिसरात मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालक आणि नागरिकांना मोठी कसरत करावी लागली. शिरूर तालुक्यातील सणसवाडी परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला असून परिसर अक्षरशः जलमय झाला होता. तसेच पाऊस सुरू होताच लहान मुलांनी भर पावसात भिजण्याचा आनंद घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातही अनेक भागांत जोरदार पाऊस झाल्याने काही रस्त्यांवर पाणी तुंबले.

Maharashtra Weather Update | रायगड आणि साताऱ्यातही वातावरणात बदल :

रायगड (Raigad) जिल्ह्यातील कर्जत, खोपोली आणि खालापूर भागांत रिमझिम पावसाच्या सरी बरसल्या. अचानक बदललेल्या हवामानामुळे कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. उष्णतेपासून काही प्रमाणात आराम मिळाला असला तरी अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. हवामान विभागाने जिल्ह्यातील इतर भागांतही पुढील काही तासांत पावसाची शक्यता वर्तवली असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

माणगाव, लोणारे आणि इंदापूर परिसरातही हलक्या सरी कोसळल्या असून माथेरान (Matheran) आणि नेरळ भागातही पावसाने वातावरण आल्हाददायक केले. सातारा (Satara) जिल्ह्यातील महाबळेश्वर (Mahabaleshwar) येथे रिमझिम पावसामुळे परिसर पुन्हा धुक्यात हरवल्याचे चित्र दिसले. तापोळा आणि प्रतापगड परिसरातही पावसाने हजेरी लावली. अचानक पडलेल्या पावसामुळे पर्यटकांनी महाबळेश्वर बाजारपेठेत गर्दी केली होती. या बदललेल्या हवामानामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांमध्येही समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

News title : Maharashtra Pre-Monsoon Rain Relief

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *