बच्चू कडूंवर उद्धव ठाकरेंचा पहिलाच घणाघात:मंत्री करणं ही माझीच चूक ठरली; प्रहारच्या कार्यकर्त्यांसमोर ठाकरे भडकले, थेट निशाणा

0
730-x-548-2026-02-05t100841277_1779444100.jpg




मुंबईत प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडूंवर पहिल्यांदाच उघडपणे निशाणा साधला. घरी बोलावून त्याला मंत्री केलं, ही माझी चूक झाली. जे लोभापायी गेलेत, त्यांना जाऊ द्या, अशा शब्दांत ठाकरे यांनी बच्चू कडूंवर तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रहार संघटनेतील सोलापूर, परभणी आणि धाराशिवमधील अनेक कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर हा राजकीय हल्ला पाहायला मिळाला. या कार्यक्रमामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी त्यांचा पक्ष एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन केला होता. त्यानंतर त्यांना विधान परिषदेची आमदारकीही मिळाली. मात्र या निर्णयामुळे प्रहार संघटनेत नाराजी निर्माण झाली होती. मराठवाड्यातील अनेक कार्यकर्त्यांनी बच्चू कडूंवर उघडपणे टीका करत आपण फसवलो गेल्याची भावना व्यक्त केली. अखेर हे नाराज कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेत दाखल झाले. यावेळी पक्षनेते अंबादास दानवे तसेच हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर उपस्थित होते. पक्षप्रवेशावेळी कार्यकर्त्यांनी बच्चू कडूंवर गंभीर आरोप केले. आम्हाला विकून बच्चू कडूंनी मिंधेसेनेत प्रवेश केला. आम्ही स्वाभिमानी आहोत, त्यामुळे ठाकरे साहेबांसोबत आलो, असे कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे सांगितले. यानंतर उद्धव ठाकरे यांनीही बच्चू कडूंवर टीकेची तोफ डागली. आपल्यातून गेलेला माणूस जुना शिवसैनिक होता. त्याला मोठं करण्याची जबाबदारी आम्ही घेतली. पण काही लोक सत्तेच्या आणि पदाच्या मोहात अडकले, असे म्हणत ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे गटावरही निशाणा साधला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात बच्चू कडू हे प्रहार पक्षाचे एकमेव आमदार होते. त्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना बच्चू कडूंना मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदाची संधी मिळाली होती. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर बच्चू कडू गुवाहाटीला गेले आणि पुढे त्यांनी शिंदे गटासोबत राजकीय वाटचाल सुरू ठेवली. अलीकडेच त्यांनी प्रहार पक्षाचे शिवसेनेत विलिनीकरण करत विधान परिषदेवर आमदारकी मिळवली. त्यामुळे विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका सुरू झाली आहे. बच्चू कडू आणि ठाकरे गटातील संघर्ष तीव्र दरम्यान, बच्चू कडूंनी यापूर्वी आपली भूमिका स्पष्ट करत आपण कोणत्याही पदासाठी शिवसेनेत गेलेलो नसल्याचे म्हटले होते. मला काही मागायचं असतं तर गुवाहाटीलाच मागितलं असतं. मी मंत्रिपदासाठी नाही, तर दिव्यांग मंत्रालयासाठी लढलो, असे ते म्हणाले होते. मात्र, त्यांच्या या भूमिकेनंतरही प्रहार संघटनेतील मोठा गट नाराज असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर बच्चू कडू आणि ठाकरे गटातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed