नागपुरात शिवसेनेचे 'मेलोडी खाओ' चॉकलेट आंदोलन:महागाई आणि केंद्र सरकारच्या 'इव्हेंट' राजकारणाविरोधात निषेध

0
076cfd38-fc61-45b6-9743-da4efeb17c0c_1779442009768.jpg




नागपुरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केंद्र सरकारच्या महागाई आणि ‘इव्हेंट’ राजकारणाविरोधात अनोखे आंदोलन केले. सीताबर्डी येथील व्हेरायटी चौकात शिवसैनिकांनी जनतेला ‘मेलोडी चॉकलेट’ वाटून निषेध नोंदवला. देशातील वाढती महागाई, इंधन दरवाढ, गॅस सिलेंडरचे वाढलेले भाव, शिक्षण क्षेत्रातील पेपरफुटीच्या घटना आणि केंद्र सरकारच्या ‘इव्हेंट’ राजकारणाचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान ‘जनता त्रस्त, मोदी मस्त’ आणि ‘मेलोडी खाओ, खुद जान जाओ’ अशा घोषणा देण्यात आल्या. संपर्क प्रमुख सतीश हरडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महानगर प्रमुख किशोर कुमेरिया यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले. यावेळी शहर प्रमुख संदीप रियाल पटेल, विक्रम राठोड आणि हरिभाऊ बनाईत उपस्थित होते. महानगर प्रमुखांनी डोक्याला काळी पट्टी बांधली होती, तर शेकडो शिवसैनिकांनी दंडाला काळ्या पट्ट्या बांधून केंद्र सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध केला. प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, हा केवळ एक निषेध नसून, देश कोणत्या दिशेने जात आहे याचे हे संकेत आहेत. पेपरफुटी, पेट्रोल-डिझेल, गॅस सिलेंडर आणि खाद्यतेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे सर्वसामान्यांना घर चालवणे कठीण झाले आहे. या महागाईचा सर्वसामान्यांच्या जीवनावर गंभीर परिणाम झाला असून, या अन्यायाविरोधात नागपुरातून मोठ्या संघर्षाची सुरुवात झाली आहे. महानगर प्रमुख किशोर कुमेरिया यांनी इशारा दिला की, सरकारने आपली धोरणे बदलली नाहीत, तर उद्या देशभरातील प्रत्येक चौकात जनता एकत्र येईल आणि सरकारची धिंड काढल्याशिवाय राहणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed