आंदोलन:औषधांच्या ऑनलाइन विक्रीविरोधात जिल्हाभरातील 4500 मेडिकल बंद
![]()
सोलापूर अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने पुकारलेल्या देशव्यापी औषध विक्रेता बंदला सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून शंभर टक्के पाठिंबा मिळाला. या बंदला सक्रिय पाठिंबा दर्शविण्यासाठी आणि आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर जिल्हाभरातील ४५०० औषध विक्रेत्यांनी मेडिकल दुकाने बंद ठेवली. तालुक्याच्या ठिकाणी निवेदन देण्यात आले. अत्यावश्यक सेवेत प्रशासनाने औषधे देण्याची व्यवस्था केली होती. सोलापुरात केमिस्ट अँड ड्रगिस्ट बांधवांनी एकत्र येत चार पुतळ्यापासून ते पूनम गेटपर्यंत मूक मोर्चा काढला. या मोर्चामध्ये जिल्हाभरातून आलेल्या औषध विक्रेत्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. ऑनलाईन पद्धतीने औषधांची विक्री बेकायदेशीर आहे. त्यावर तत्काळ बंदी आणावी. या प्रमुख मागणीसाठी शहरातील सर्व १३०० औषध विक्रेत्यांनी संपात सहभाग नोंदवला. बुधवारी सकाळी चार हुतात्मा पुतळा येथून सुरू झाला. हातात निषेधाचे फलक आणि दंडाला काळ्या फिती लावून हजारो औषध विक्रेते यात सहभागी झाले होते. कोणतीही घोषणाबाजी न करता केवळ शांततेच्या मार्गाने शासनाचा निषेध नोंदवून त्यांनी संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. पूनम गेट येथे मूक मोर्चाचे विसर्जन करण्यात आले. सयावेळी सोलापूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष व्यंकटेश पुजारी, जिल्हा सचिव राजेश विरपे, बसवराज मनोरे, जिल्हा सहसचिव सिद्धेश्वर काळे, मनीष बलदवा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 1. फार्मासिस्टच्या उपस्थितीविना ऑनलाईन माध्यमातून थेट घरी पोहोचवली जाणारी औषधे कायद्याचे उल्लंघन करत आहेत. यामुळे रुग्णांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होत आहे. 2. मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून ग्राहकांना दिले जाणारे अवाजवी डिस्काउंट आणि भ्रामक जाहिरातींमुळे प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या स्थानिक आणि किरकोळ औषध विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. 3. शासनाने नुकत्याच लागू केलेल्या काही नवीन नियमांमुळे पारंपारिक औषध व्यवसायावर गदा येत असून, व्यवसाय करणे कठीण झाले आहे. बार्शी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळी तहसील कार्यालयात जाऊन बंद बाबतचे निवेदन तहसीलदारांच्या प्रतिनिधीकडे सुपूर्द केले. इमर्जन्सी सेवेसाठी डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटल, सुविधा हॉस्पिटल, महालक्ष्मी मेडिकल, डॉ. अंधारे हॉस्पिटल, श्री समर्थ मेडिकल, डॉ. पडवळ हॉस्पिटल, प्रगती मेडिकल, डॉ. सोमानी हॉस्पिटल व शिवाई मेडिकल वैराग येथे औषधी विक्री सुरू ठेवण्यात आली होती. यावेळी जिल्हाध्यक्ष व्यंकटेश पुजारी, जिल्हा सचिव राजेश विरपे तसेच बसवराज मणुरे यांनी औषध विक्रेत्यांच्या दैनंदिन समस्यांवर आणि व्यवसायातील आव्हानावर सविस्तर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, सरकारने ऑनलाईन औषध विक्रीवर तातडीने कडक निर्बंध लादले पाहिजेत. अवाजवी डिस्काउंट देणाऱ्या ई-फार्मसी कंपन्यांवर कारवाई करून सर्वसामान्यांना सुरक्षित औषधे मिळतील आणि स्थानिक विक्रेत्यांना समान व्यवसायाची संधी मिळेल, याची काळजी घ्यावी. शासनाने मागण्यांकडे लक्ष न दिल्यास आंदोलन छेडण्यात येईल. बार्शीत अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या आवाहनानुसार ऑनलाईन औषध विक्री विरोधात गुरुवारी (दि. २०) पुकारण्यात असलेल्या अखिल भारतीय बंदमध्ये बार्शी सर्व तालुक्यातील औषध विक्रेता दुकानदारांनी सहभाग घेऊन घेतला. दरम्यान संघटनेच्या वतीने हा बंद १०० टक्के यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले आहे. करमाळा तालुक्यातील २०४ मेडिकल पूर्ण बंद राहिल्यामुळे तालुक्यात हा बंद यशस्वी ठरला. माढा तालुक्यातील सुमारे ४०० औषध विक्रेत्यांनी संपात सक्रिय सहभाग नोंदविला. माळशिरस तालुक्यातील ५ वगळता ६९५ औषध दुकाने बंद ठेवली होती. अती तातडीच्या सेवेसाठी ही ५ दुकाने सुरू ठेवण्यात आली असल्याची माहिती माळशिरस तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विठ्ठलराव गायकवाड यांनी सांगितले. मंगळवेढा शहर व तालुक्यातील एकूण १८७ दुकाने बुधवारी बंद कडकडीत बंद ठेवले.
