रोहिंग्या-बांगलादेशींच्या अवैध बांधकामांवरून वाद:पालिकेकडून बेकायदेशीर छबीलाचे पाडकाम सुरू, दोषींवर एफआयआरचे आदेश
![]()
मुंबईतील मालवणी परिसरामध्ये कथित बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना स्थानिक लोकप्रतिनिधींच्या संरक्षणात आश्रय दिला जात असल्याचा गंभीर आरोप राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केला आहे. येथील अब्बासिया कंपाउंडमधील एका हिंदू महिलेच्या घराचा रस्ता रोखून केलेले अवैध बांधकाम आणि रस्त्यावरील बेकायदेशीर छबील (प्याऊ) यांवरून मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणी प्रशासनाने तत्परता दाखवत बेकायदेशीर सिमेंटचे बांधकाम जमीनदोस्त करण्याची कारवाई सुरू केली असून, दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. सावरिया मशीद परिसरातील रहिवासी रागिनी चौरसिया यांच्या घराचा मुख्य दरवाजाच शौकत हुसैन सैय्यद याने बेकायदेशीर बांधकाम करून बंद केला होता. याबाबत माहिती मिळताच मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी थेट मालवणी पोलीस ठाणे गाठून वरिष्ठ अधिकाऱ्यांना या भू-माफियांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले. फस्ट वर्जन या कारवाईबद्दल बोलताना कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, “देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कायद्याचे राज्य असताना हिंदू समाजावरील अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत. घुसखोरांच्या या आश्रयस्थानांवर आणि मुख्य सूत्रधारांवर अशी कडक कारवाई केली जाईल, की भविष्यात कोणीही असे धाडस करणार नाही.” दिव्य मराठी इनसाइड स्टोरी : राजकीय वरदहस्त आणि अतिक्रमण या वादाच्या केंद्रस्थानी स्थानिक राजकीय साखळी समोर आली आहे. स्थानिक आमदार अस्लम शेख यांच्या नगरसेवक पुत्राच्या कथित संरक्षणात, मुंबई महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता रस्त्यावर ६ बाय १२ फुटांचे बेकायदेशीर सिमेंटचे छबील उभारून जागा बळकावण्याचा प्रयत्न झाला. हे केवळ साधे अतिक्रमण नसून, देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या संशयास्पद घटकांना पाठीशी घालण्याचा प्रशासकीय स्तरावरील प्रकार असल्याचा आरोप होत आहे.
