विधान परिषद निवडणूक:ठाणे-पालघरमध्ये भाजप-शिंदे सेना आमनेसामने, परभणी-हिंगोलीत जागा एकाची अन् दावेदार अनेकांचे!

0
db-temp-cover-marathi-2026-05-19t154217743_1779185591.jpg




गेल्या दोन-तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर मुहूर्त लागला असून, विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषण केली आहे. या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, विशेषतः ठाणे-पालघर आणि परभणी-हिंगोली या दोन मतदारसंघांमध्ये जागावाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. ठाणे-पालघर हा संयुक्त मतदारसंघ गेल्या अनेक दशकांपासून अविभाजित शिवसेनेचा अभेद्य गड राहिला आहे. स्वर्गीय आनंद दिघे यांच्या काळापासून येथे शिवसेनेचे वर्चस्व आहे. मात्र, सध्या बदललेल्या राजकीय समीकरणात येथे संख्याबळाचे गणित भाजपच्या बाजूने झुकलेले दिसत आहे. या मतदारसंघात एकूण १०३० मतदारांपैकी भाजपकडे ४४४ मते आहेत, तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि निलेश सांबरे गटाचे मिळून ३४६ संख्याबळ आहे. शिंदे गटाकडून माजी आमदार रवींद्र फाटक आणि नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले आनंद परांजपे यांच्या नावांची चर्चा आहे. दुसरीकडे, संख्याबळ अधिक असल्याने भाजपनेही या जागेवर दावा ठोकला असून ते आपला उमेदवार रिंगणात उतरवण्यासाठी आग्रही आहेत. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीकडे ७१ मते असून, ती निर्णायक ठरू शकतात. परभणी-हिंगोली: जागा एक अन् दावेदार अनेक! परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सध्या ‘हायव्होल्टेज’ राजकीय ड्रामा पाहायला मिळत आहे. या जागेवर सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विप्लव बाजोरिया आमदार आहेत, मात्र आता महायुतीमधील इतर दोन मित्रपक्षांनीही येथे दंड थोपटले आहेत. महायुतीतील इच्छुक उमेदवार शिंदे शिवसेना: विप्लव बाजोरिया, सईद खान आणि राम कदम इच्छुक आहेत. अजित पवार राष्ट्रवादी: १३१ मतांच्या सर्वात मोठ्या संख्याबळाचा हवाला देत माजी आमदार विजय भांबळे यांनी दावा केला आहे. भाजप: ९९ मते असलेल्या भाजपकडून संतोष मुरकुटे आणि गजानन घुगे यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाविकास आघाडीतही आलबेल नाही या मतदारसंघात काँग्रेसचे पारडे नेहमीच जड राहिले आहे. मात्र, यावेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने थेट काँग्रेसच्या हक्काच्या जागेवर दावा सांगितला आहे. काँग्रेसकडून सिद्धार्थ हत्तीअंबिरे आणि माजी आमदार सुरेश देशमुख इच्छुक आहेत, तर ‘उबाठा’ सेनेकडून डॉ. विवेक नावंदर यांचे नाव चर्चेत आहे. इच्छुकांकडून पक्षश्रेष्ठींकडे लॉबिंग सुरू जागा एक आणि मित्रपक्षांचे दावे अनेक अशी परिस्थिती दोन्ही आघाड्यांमध्ये निर्माण झाली आहे. आपल्या पक्षाला उमेदवारी मिळावी यासाठी अनेक इच्छुकांनी आता मुंबई गाठून वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी आणि ‘लॉबिंग’ सुरू केले आहे. त्यामुळे वरिष्ठ नेते या पेचातून कोणता मार्ग काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed