आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत एकच निर्णय:रितनंद बलवेद एज्युकेशन फाऊंडेशनला पनवेल तालुक्यात 15 जमीन देण्याचा निर्णय
![]()
राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत महसूल व वन विभागाशी संबंधित केवळ एकच निर्णय घेण्यात आला. त्यात ॲमिटी विद्यापीठाच्या विस्तारासाठी रितनंद बलवेद एज्युकेशन फाऊंडेशन या शैक्षणिक संस्थेला रायगडच्या पनवेल तालुक्यातील भाताण येथील तब्बल 15 एकर जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला. रितनंद बलवेद एज्युकेशन फाऊंडेशन ही 1986 साली स्थापन झालेली भारतातील एक प्रमुख ना-नफा संस्था आहे. जगप्रसिद्ध ॲमिटी युनिव्हर्सिटीची ही पालक संस्था आहे. या संस्थेतर्फे प्री-नर्सरीपासून उच्च शिक्षणापर्यंत आणि त्यानंतर संशोधनापर्यंत जागतिक दर्जाचे शिक्षण प्रदान केले जाते. या संस्थेने आपल्या शैक्षणिक कार्याचा विस्तार करण्यासाठी सरकारकडे भूखंडाची मागणी केली होती. त्यानुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संस्थेला रायगड जिल्ह्यातील 15 एकर जमीन देण्याचा निर्णय झाला. काय आहे सरकारच्या निर्णयात? रितनंद बलवेद एज्युकेशन फाऊंडेशनच्या ॲमिटी विद्यापीठांतर्गत 18 शाखांमधून विविध शैक्षणिक अभ्यासक्रम शिकवले जातात. याठिकाणी 5 हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून इतर अभ्यासक्रम आणि शैक्षणिक विस्तारासाठी संस्थेने जमिनीची मागणी केली आहे. त्यानुसार मौजे भाताण, ता. पनवेल, जि. रायगड येथील ( स.न. 8/0, 9/2, 10/3, 13/5, 14/0, 167/1, 178/0, 182/4 ) या आकारीपड जमिनीपैकी सुमारे 15 एकर जमीन विशेष बाब म्हणून देण्यास मंजुरी देण्यात आली. ही जमीन कब्जेहक्काची रक्कम भरून घेऊन वर्ग-2 या धारणाधिकाराने उपलब्ध करून दिली जाणार आहे. या जमिनीचा वापर शैक्षणिक संकुल तसेच खेळाची मैदाने, वसतीगृहे, ग्रंथालय, प्रयोगशाळा अशा शैक्षणिक कारणासाठी केला जाणार आहे. अवकाळीग्रस्तांनाही मदत होणार दुसरीकडे, राज्य सरकारने मार्च 2026 या कालावधीत अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याबाबतचा महसूल व वन विभागाचा शासन निर्णय सोमवार, 18 मे, 2026 रोजी निर्गमित झाला आहे. त्यानुसार 164 कोटी 83 लाख 44 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. हे ही वाचा… नीट पेपरफुटीचे जाळे नागपूरपर्यंत:नांदेड कनेक्शनमध्ये असलेला ‘आलोक’ CBIच्या रडारवर, मोटेगावरच्या मुलालाही घेतले ताब्यात
देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘नीट-यूजी २०२६’ (NEET-UG) पेपरफुटी घोटाळ्यात आता नागपूर कनेक्शन समोर आहे. या रॅकेटचा नांदेड पॅटर्न तपासताना सीबीआयच्या रडारवर आता नागपूर येथील ‘आलोक’ नावाचा संशयित मास्टरमाइंड आला आहे. या आलोकनेच किमान एक हजार विद्यार्थ्यांना नीटचा पेपर विकल्याचा दाट संशय केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला आहे. वाचा सविस्तर
