NCP च्या झिशान सिद्दीकींची आमदारकी धोक्यात?:प्रदेशाध्यक्ष म्हणून तटकरेंची स्वाक्षरी ठरणार कारण; नुकतीच विधान परिषदेवर झाली निवड

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-05-17t12_1779001103.png




सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ने नुकतेच झिशान सिद्दीकी यांना विधान परिषदेवर पाठवले. मात्र, त्यांच्या उमेदवारीच्या एबी फॉर्मवर सुनील तटकरे यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून केलेल्या स्वाक्षरीवरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. तटकरे सध्या पक्षाचे अधिकृत प्रदेशाध्यक्ष आहेत की नाही, याबाबतच संभ्रम असल्याने झिशान सिद्दीकी यांच्या आमदारकीवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घडामोडीमुळे राष्ट्रवादीच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीने नुकतेच झिशान सिद्दीकी यांना विधान परिषदेवर पाठवले होते. पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या प्रदिर्घ चर्चेनंतर झिशान सिद्दीकी यांना संधी देण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर सुनील तटकरे यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्या एबी फॉर्मवर स्वाक्षरी केली होती. पण राष्ट्रवादीने पक्षाध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या सहीने निवडणूक आयोगाला पाठवलेल्या एका पत्रात सुनील तटकरे यांचा प्रदेशाध्यक्ष म्हणून उल्लेख नाही. त्यामुळे तटकरेंची स्वाक्षरी झिशान सिद्दीकींसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांच्या स्वाक्षरीच्या 29 एप्रिलच्या सदर पत्रात पक्षाकडून करण्यात येत असलेला हा पत्रव्यवहार अंतिम समजण्यात यावा असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 30 एप्रिल रोजी झिशान सिद्दीकी यांनी विधान परिषदेच्या आपल्या उमेदवारी अर्जात एक एबी फॉर्म जोडला. त्यावर प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांची स्वाक्षरी आहे. पण निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डनुसार, तटकरे हे प्रदेशाध्यक्षपदावर अधिकृत नसतील, तर त्यांनी एबी फॉर्मवर केलेली स्वाक्षरीही आपसूकच तांत्रिकदृष्ट्या अवैध ठरू शकते. या परिस्थितीत झिशान सिद्दीकी यांना राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार मानण्यात कायदेशीर अडचण निर्माण होऊ शकते. पर्यायाने झिशान यांची आमदारकी संकटात सापडू शकते अशी शक्यता व्यक्ती केली जात आहे. सुनील तटकरेंसंबंधीचा काय आहे वाद? राष्ट्रवादी काँग्रेसने 29 एप्रिल रोजी निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवले होते. या पत्रात त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची माहिती दिली होती. त्यात सुनील तटकरे यांच्या नावापुढे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असा उल्लेख नव्हता. यामुळे त्यांच्या पक्षातील स्थितीविषयी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीने शनिवारी एका पत्रकार परिषदेद्वारे सुनील तटकरे हे पूर्वीसारखेच आपल्या पदावर कायम असल्याचे स्पष्ट् केले. तसेच या प्रकरणी आयोगाला पत्र पाठवून तटकरेंच्या स्थितीची कल्पना दिली जाईल असेही नमूद केले. पण त्यानंतरही ही चर्चा अद्याप थांबली नाही. शेवटी पाहू कोण आहेत झिशान सिद्दीकी? झिशान सिद्दीकी हे काँग्रेसचे दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांचे सुपुत्र आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ते वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडू आले होते. त्यांनी मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्षपदी सांभाळले. पण 12 ऑक्टोबर 2024 रोजी बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली. त्यानंतर त्यांनी अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा ठाकरे गटाच्या वरुण सरदेसाई यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता पक्षाने त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला होता. पण आता त्यांची निवडच वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *