संघर्ष, साधना आणि हजारो विद्यार्थ्यांचा विश्वास — शिवराज मोटेगावकर सरांची प्रेरणादायी कहाणी

0
images

संघर्ष, साधना आणि हजारो विद्यार्थ्यांचा विश्वास — शिवराज मोटेगावकर सरांची प्रेरणादायी कहाणी

शून्यातून स्वतःचं विश्व उभं करणारी माणसं फार कमी असतात. त्यांच्या यशामागे ना मोठा पैसा असतो, ना राजकीय पाठबळ… असते ती फक्त जिद्द, अथक मेहनत आणि विद्यार्थ्यांप्रती असलेलं निस्सीम प्रेम.

असं प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे केमिस्ट्रीचे गोल्ड मेडलिस्ट शिवराज मोटेगावकर सर.

आज देशभरात आदराने घेतलं जाणारं आर.सी.सी. पॅटर्नचं नाव हे केवळ एका संस्थेचं यश नाही, तर एका शिक्षकाच्या संघर्ष, प्रामाणिकपणा आणि आयुष्यभराच्या साधनेची कहाणी आहे.

एक काळ असा होता, जेव्हा मोटेगावकर सर सायकलवरून गावोगावी फिरून विद्यार्थ्यांना शिकवत होते.

घरोघरी जाऊन ट्युशन्स घेणारे सर दिवस-रात्र मेहनत करत विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देत होते. त्या काळात ना मोठी इमारत होती, ना मोठा स्टाफ… पण एक मोठं स्वप्न होतं — ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही डॉक्टर, इंजिनिअर आणि अधिकारी बनवायचं.

सरांनी फक्त अभ्यास शिकवला नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला.

अनेक गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना आधार दिला, योग्य दिशा दिली आणि त्यांच्या स्वप्नांना पंख दिले. आज हजारो विद्यार्थी देशभरात विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत आणि त्यांच्या यशामागे मोटेगावकर सरांचं मार्गदर्शन महत्त्वाचं मानलं जातं.

विशेष म्हणजे एवढं यश मिळूनही सरांचा साधेपणा आजही तसाच कायम आहे.

आजही ते दररोज ८ ते १० तास विद्यार्थ्यांना शिकवतात. कारण शिक्षण हा त्यांच्यासाठी व्यवसाय नसून एक साधना आहे. विद्यार्थ्यांबद्दलचं प्रेम, नम्रता आणि प्रामाणिकपणाचा संदेश हीच त्यांची खरी ओळख बनली आहे.

पांडुरंगाचे निस्सीम भक्त असलेले मोटेगावकर सर आयुष्यभर विद्यार्थ्यांना सचोटीचा मार्ग दाखवत आले आहेत. त्यामुळेच अलीकडे त्यांच्या नावाचा उल्लेख कथित पेपरफुटी प्रकरणात होत असल्याने विद्यार्थी, पालक आणि माजी विद्यार्थ्यांमध्ये तीव्र भावना व्यक्त होत आहेत.

“ज्यांनी आयुष्यभर कष्ट, प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान शिकवला… अशी व्यक्ती चुकीच्या मार्गाने जाईल, यावर विश्वास बसत नाही,” अशी भावना अनेक विद्यार्थी आणि पालक व्यक्त करत आहेत.

सत्याला वेळ लागू शकतो, पण सत्य कायम टिकतं — हा विश्वास आज हजारो विद्यार्थ्यांच्या मनात आहे.

मोटेगावकर सर हे केवळ शिक्षक नाहीत, तर अनेकांसाठी प्रेरणेचा दीप आहेत… आणि राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed