‘सीतेची न सांगितलेली कथा’ पुस्तकाचे प्रकाशन 28 मे रोजी:रामायणातील कोड्यांची उत्तरे पुस्तकातून मिळणार
![]()
अमेरिकन ज्युईश लेखिका डेना मरियम यांच्या मूळ इंग्रजी पुस्तक ‘द अनटोल्ड स्टोरी ऑफ सीता’ च्या मराठी अनुवादाचे प्रकाशन होणार आहे. ‘सीतेची न सांगितलेली कथा’ असे या मराठी पुस्तकाचे नाव असून, २८ मे २०२६ रोजी ते वाचकांच्या भेटीला येईल. मोतीलाल बनारसीदास पब्लिशर्स, भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन आणि माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रकाशन होत आहे. पुस्तकाचे समन्वयक मुकुंद हिरवे आणि भारतीय विचार साधना, पुणे प्रकाशनचे कार्यवाह काशीनाथ देवधर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हा प्रकाशन सोहळा २८ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता कोथरुड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या संत श्री ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे मार्गदर्शक भैय्याजी जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल कराड आणि कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस यांचीही उपस्थिती असेल. ‘सीतेची न सांगितलेली कथा’ हे पुस्तक रामायणातील अनेक कोड्यांची वैध आणि समर्पक उत्तरे देईल, असा दावा करण्यात आला आहे. हे पुस्तक सीतामातेला महान नारायणी देवीचा अवतार म्हणून सादर करते, रामायणातील तिच्या पारंपरिक कथानकापलीकडे जाऊन तिचे खरे स्वरूप उलगडते. ज्या काळात मानव निसर्गापासून दुरावत चालला होता, त्या काळात एका नवीन संस्कृतीचा पाया घालण्यासाठी सीतामाता श्रीरामांसोबत पृथ्वीवर अवतरली आणि तिने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले, असे पुस्तकात म्हटले आहे. हे पुस्तक स्त्रीच्या शहाणपणा, धैर्य आणि सामर्थ्याची, तसेच तिच्या व्यक्त आणि अव्यक्त जगावरील प्रेमाची आणि सर्वांच्या कल्याणासाठी केलेल्या निःस्वार्थ त्यागाची कथा सांगते.
