राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? पुण्यात गुप्त बैठकीनंतर राजकीय चर्चांना उधाण:सुनेत्रा पवार शांत, पण पडद्यामागे जोरदार हालचाली

0
730-x-548-new-2026-05-15t114915388_1778826052.jpg




राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षातील समीकरणे वेगाने बदलताना दिसत असून, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट पुन्हा एकत्र येण्याबाबत पडद्यामागे हालचाली सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची सूत्रे सुनेत्रा पवार यांनी हाती घेतली असली, तरी दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाबाबत राजकीय वर्तुळात सातत्याने चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, या संदर्भात शरद पवार यांनी यापूर्वी अजित पवार विलीनीकरणाबाबत सकारात्मक असल्याचे संकेत दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील नेत्यांकडून वेळोवेळी विलीनीकरणाबाबत भाष्य करण्यात येत असताना, अजित पवार गटाकडून मात्र अधिकृत पातळीवर अशी कोणतीही चर्चा नसल्याचे सांगण्यात आले होते. तरीही गेल्या काही दिवसांत घडणाऱ्या घटनांमुळे राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे. रोहित पवार यांनीही विविध कार्यक्रमांत दोन्ही गट एकत्र येण्याबाबत सकारात्मक संकेत दिले होते. मात्र सुनेत्रा पवार यांनी या विषयावर मौन बाळगल्याने चर्चेला अधिकच उधाण आले आहे. दरम्यान, पुण्यात शरद पवार गटातील प्रमुख नेत्यांची एक गुप्त बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. ही बैठक पक्ष कार्यालयाऐवजी एका खासगी हॉटेलमध्ये झाल्याने तिचे महत्त्व वाढले आहे. या बैठकीत राष्ट्रवादीच्या भविष्यातील राजकीय रणनीतीसह विलीनीकरणाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. बैठकीला माजी मंत्री अनिल देशमुख, खासदार अमोल कोल्हे, हर्षवर्धन पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील आणि पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. ही बैठक बराच वेळ सुरू होती आणि त्यामध्ये पक्षातील अंतर्गत घडामोडींवर सखोल चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. बैठकीदरम्यान दोन्ही राष्ट्रवादी गटांतील राजकीय समीकरणे, आगामी निवडणुका आणि संघटनात्मक बदल यावरही चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. या बैठकीनंतर काही नेत्यांचे एकत्रित छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय चर्चांना आणखी वेग आला आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या राजकीय हालचाली होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तटकरे आणि शरद पवार यांची प्रत्यक्ष भेट याच दरम्यान, राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते सुनील तटकरे यांनी अचानक शरद पवार यांची भेट घेतल्याने चर्चांना आणखी खतपाणी मिळाले. दोन वर्षांनंतर तटकरे आणि शरद पवार यांची प्रत्यक्ष भेट झाल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लावले जाऊ लागले. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना तटकरे यांनी ही केवळ शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी घेतलेली भेट असल्याचे सांगितले. मात्र पुण्यातील गुप्त बैठकीत या भेटीबाबतही चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले दरम्यान, या सर्व घडामोडींमुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकत्र येणार का, हा प्रश्न आता जोर धरू लागला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीत पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी विलीनीकरणाचा पर्याय पुढे येत असल्याची चर्चा आहे. अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली, तरी पुण्यातील गुप्त बैठक, तटकरे-पवार भेट आणि नेत्यांकडून दिले जाणारे संकेत यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed