नागपूर – वर्ध्यात उष्णतेचा यलो अलर्ट:सकाळी ११ ते ४.३० पर्यंत सार्वजनिक कार्यक्रमांना मनाई, शाळांना सूचना
![]()
हवामान विभागाने नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांसाठी १६ ते १८ मे दरम्यान ‘हीट वेव्ह’चा यलो अलर्ट जारी केला आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी सकाळी ११ ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत सार्वजनिक कार्यक्रम आयोजित न करण्याचे निर्देश दिले आहेत. उष्णतेच्या तीव्र लाटेच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त कार्यालयात विशेष आढावा बैठक झाली. या बैठकीत विद्यार्थी, कामगार, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले. सर्व शासकीय व खासगी आस्थापना, शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग सेंटर यांनी उष्णतेपासून संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. विशेषतः दुपारच्या वेळेत मैदानी कार्यक्रम, सभा, क्रीडा स्पर्धा किंवा गर्दीचे आयोजन टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘कोल्ड वॉर्ड’ तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. उष्माघाताच्या रुग्णांवर तातडीने उपचार करता यावेत यासाठी आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत. मे आणि जून महिन्यात उष्णतेचा धोका कायम राहण्याची शक्यता असल्याने जनजागृती मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महानगरपालिका क्षेत्रात ‘सेन्टर होम’सारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील प्रमुख चौकांमध्ये ग्रीन नेट उभारणे, आरोग्य केंद्रांमध्ये विशेष सुविधा उपलब्ध करणे आणि शाळा-महाविद्यालयांना सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. नागपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेसंदर्भातील विशेष उपाययोजना १६ जूनपर्यंत लागू राहतील, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. या बैठकीला वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांतील अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
