नागपूर पोलिसांचा सायबर गुन्हेगारांना दणका:नागरिकांचे साडेचार कोटी रुपये आणि २३२ मोबाईल केले परत!

0
fa007039-2923-43eb-958c-c74c2da01ecb_1778994848060.jpg




नागपूर पोलिसांनी सायबर गुन्हेगारांना मोठा दणका दिला आहे. सायबर फसवणुकीत गमावलेले नागरिकांचे तब्बल ४ कोटी ४९ लाख २४ हजार २६६ रुपये आणि चोरीला गेलेले २३२ मोबाईल आज त्यांना परत करण्यात आले. नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित एका विशेष कार्यशाळेत पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या हस्ते ही रक्कम आणि मोबाईल परत करण्यात आले. या कार्यशाळेचे आयोजन सायबर सुरक्षेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी करण्यात आले होते. यावेळी विधी प्राध्यापक डॉ. दिशा खैरे (कायदा तंत्रज्ञान आणि धोरण केंद्र, एमएनएलयु, नागपूर), भारतीय रिझर्व्ह बँकेचे सहाय्यक प्रबंधक पीयुष तेलरांधे आणि सायबर व डिजिटल फॉरेन्सिक तज्ज्ञ हिमांशू जोशी यांनी सायबर फसवणुकीचे विविध प्रकार आणि त्यापासून बचाव करण्याच्या उपायांवर सविस्तर मार्गदर्शन केले. जानेवारी २०२६ पासून नागपूर शहरात सायबर फसवणुकीच्या अनेक गंभीर तक्रारी दाखल झाल्या होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारच्या गुन्हेगारी पद्धती समोर आल्या. पहिल्या प्रकारात, सायबर गुन्हेगारांनी नागरिकांना ‘डिजिटल अरेस्ट वॉरंट’ जारी झाल्याची भीती दाखवली. ते स्वतःला सीबीआय किंवा ईडीचे अधिकारी भासवून मोबाईलवर व्हिडिओ कॉल करत आणि बनावट अरेस्ट वॉरंट दाखवून कारवाई टाळण्यासाठी आरबीआयकडे पैसे जमा करण्यास सांगत. यातून त्यांनी पीडित व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यांची गोपनीय माहिती मिळवली. दुसऱ्या प्रकारात, गुन्हेगारांनी सोशल मीडियाद्वारे तक्रारदारांशी संपर्क साधला. शेअर ट्रेडिंगमध्ये मोठी गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळेल, असे आमिष दाखवून त्यांना बनावट शेअर ट्रेडिंग ॲप्स डाउनलोड करण्यास भाग पाडले. यानंतर वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे भरण्यास सांगून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली. या सर्व गंभीर प्रकरणांचा तपास नागपूर सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने अत्यंत चपळाईने आणि तांत्रिक कौशल्याने केला. सायबर पोलिसांनी तातडीने कारवाई करत गुन्हेगारांच्या बँक खात्यांमधील एकूण ४ कोटी ४९ लाख २४ हजार २६६ रुपये ‘लीन’ आणि ‘फ्रीज’ करून गोठवले. माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार, ही गोठवलेली रक्कम आज कार्यशाळेत संबंधित पीडित नागरिकांना चेकच्या स्वरूपात परत करण्यात आली. या मोठ्या कामगिरीसोबतच, पोलिसांनी नागपूर शहरासह इतर शहरांमधून शोध घेऊन एकूण २३२ महागडे मोबाईल हँडसेट जप्त केले. या जप्त केलेल्या मोबाईलची अंदाजे किंमत ४३ लाख १८ हजार ३४७ रुपये आहे. आजच्या कार्यशाळेत हे सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *