महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष:समता परिषदेचा ‘समता चित्ररथ’ नागपुरात दाखल; संविधान चौकात नागरिकांची मोठी गर्दी

0
e90ced34-5a0a-4cee-944e-b839e6c793cc_1778994298158.jpg




क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती महोत्सवाचे औचित्य साधून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने तयार केलेला विशेष ‘समता चित्ररथ’ शनिवारी (16 मे) नागपूर शहरात दाखल झाला. रविवार, 17 मे रोजी सकाळी 9 वाजता हा चित्ररथ संविधान चौकात नागरिकांच्या दर्शनासाठी आणण्यात आला. यावेळी शिव-शाहू-फुले-आंबेडकरप्रेमी नागरिकांनी दर्शनासाठी आणि स्वागतासाठी मोठी गर्दी केली होती. केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने 11 एप्रिल 2026 ते 10 एप्रिल 2027 या कालावधीत महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच शृंखलेत समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष व मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच माजी खासदार समीर भुजबळ आणि आमदार पंकज भुजबळ यांच्या संकल्पनेतून या फिरत्या चित्ररथाची निर्मिती करण्यात आली आहे. हा रथ सध्या समाज प्रबोधनाचा संदेश देत संपूर्ण महाराष्ट्रभर फिरवला जात आहे. या चित्ररथामध्ये क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे अर्धाकृती पुतळे आणि महात्मा फुलेंचा पूर्णाकृती पुतळा हे मुख्य आकर्षण आहेत. यासोबतच राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही देखणे पुतळे यात साकारण्यात आले आहेत. देशातील पहिल्या मुलींच्या शाळेची आठवण करून देणारी ‘भिडे वाड्याची प्रतिकृती’ तसेच महात्मा फुले यांचे साहित्य, पुस्तक आणि पेन या ज्ञानाच्या प्रतीकांची प्रभावी मांडणी रथावर करण्यात आली आहे.

हा चित्ररथ समता, बंधुता, न्याय आणि ज्ञान या मूल्यांचा प्रसार करत महाराष्ट्रातील गावोगावी पोहोचत आहे. नागपूर शहरात आगमन होताच विविध चौकांमध्ये महामानवांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. समता रथाच्या माध्यमातून समाजात सलोखा आणि एकात्मतेचा संदेश दिला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *