पडळकर आजच्या काळातील मल्हारराव होळकर- खोत:कितीही दिलं तरी 'माझं काही झालं नाही' असं म्हणणं सदाभाऊंकडून शिकावं- जयकुमार गोरे
![]()
जत तालुक्यामध्ये गेल्या शंभर वर्षांत जेवढा विकास झाला नाही, तेवढा विकास पडळकरांनी अवघ्या दीड वर्षांत करून दाखवला आहे. त्यांनी केवळ विकासकामेच केली नाहीत, तर येथे नगरपालिका आणि पंचायत समितीही निवडून आणली. मी तर म्हणेन, आजच्या युगातला सरसेनापती मल्हारराव होळकर कोण असेल, तर त्याचे नाव गोपीचंद पडळकर आहे, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. सदाभाऊ खोत म्हणाले की, आता मी असे बोललो की काही लोक नक्कीच टीका करायला लागणार, पण आम्हाला चांगलेच माहित आहे की कुठे बटण दाबायचे, असा इशाराही खोत यांनी विरोधकांना दिला आहे. जतची वकिली करण्यासाठी सदाभाऊंना बोलावलं दरम्यान सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावर बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, मी सदाभाऊंना इथे आमदार म्हणून किंवा माझे मित्र म्हणून बोलावलेले नाही. तर जत तालुक्याची वकिली त्यांनी कोणत्याही मानधनाशिवाय करावी, यासाठी त्यांना बोलवले आहे. तुम्ही मंचावर फक्त जतच्या विकासावरच बोलायचं, स्वतःचं वैयक्तिक काहीही बोलायचं नाही. सदाभाऊ सर्वांत चतुर आमदार या जुगलबंदीत राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनीही उडी घेतली. गोरे म्हणाले की, सदाभाऊ भाषणात नेहमीच मी खूप साधा माणूस आहे, मला काही समजत नाही असा आव आणतात. पण खरं सांगायचे तर, संपूर्ण महाराष्ट्रात सदाभाऊ खोत यांच्या इतका चतुर आमदार शोधूनही सापडणार नाही. कुणाला कुठे दाबायचं, कुणाकडून कशी कामे करून घ्यायची आणि कितीही मिळाले तरी ‘माझं अजून काहीच झाले नाही, मला कमीच मिळाले’ असे कसे दाखवायचे, याचे ट्रेनिंग जर कुणाला हवे असेल, तर त्यांनी सदाभाऊ खोत यांच्याकडूनच क्लास लावायला हवेत.
