राज्यात पेट्रोल – डिझेल टंचाईच्या झळा:परभणी, बुलढाणा, वाशिममध्ये तीव्र टंचाई, पेट्रोल पंपांवर ग्राहकांत हाणामारी; पुण्यात मनसे आक्रमक

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-05-15t11_1778994155.png




आखाती देशांतील घडामोडीमुळे अवघ्या जगाला इंधन टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्याच्या झळा आता हळूहळू महाराष्ट्रालाही बसत आहेत. राज्यातील परभणी, बुलढाणा व वाशिम या जिल्ह्यांतील बहुतांश पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे फलक लागलेत. त्यामुळे नागरिकांची काही मोजक्याच पंपांवर इंधनासाठी मोठी गर्दी होत आहे. यावेळी ग्राहकांत बाचाबाची होऊन वाद होत असल्यामुळे परिस्थिती गंभीर बनत आहे. दरम्यान, मनसेने या प्रकरणी पुण्यात आक्रमक भूमिका घेतली आहे. पण पोलिसांनी त्यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. बुलढाण्यात पोलिसांसमोर ग्राहकाला मारहाण बुलढाणा जिल्ह्यातील इंधन टंचाईची स्थिती फारच गंभीर बनली आहे. जिल्ह्यातील एकूण 165 पेट्रोल पंपांपैकी निम्म्याहून अधिक पंप गत 3 दिवसांपासून इंधन नसल्यामुळे बंद आहेत. विशेषतः सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांगरा येथील पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला काही दुचाकीस्वार गुंडांनी बेदम मारहाण केली. यावेळी पोलिसही घटनास्थळी हजर होते. पण त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही असा आरोप आहे. वाशिम जिल्ह्यातही इंधनासाठी हाणामारी दुसरीकडे, वाशिम जिल्ह्यातील इंधनासाठी हाणामारी होण्याच्या घटना घडत आहेत. वाशिमच्या छाबडा पेट्रो पंपावर डिझेलसाठी ग्राहकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. जिल्ह्यात गत 3 दिवसांपासून डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच शनिवारी दुपारी शहरातील छाबडा पेट्रोल पंपावर डिझेलचे टँकर आल्यानंतर ग्राहकांनी मोठी गर्दी केली. यावेळी रांगेत उभे राहण्याच्या मुद्यावरून ग्राहकांत शाब्दिक वाद झाला. या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. या घटनेमुळे पेट्रोल पंपावर काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पंप चालकांनी या प्रकरणी 112 क्रमांकावर फोन केला. पण त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असा आरोप केला जात आहे. परभणी शहरासह जिल्ह्यावर इंधन टंचाईचे गडद सावट परभणी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पुन्हा एकदा इंधन टंचाईचे गडद सावट निर्माण झाले आहे. मुख्य डेपोकडून इंधनाचा पुरवठा वेळेत न झाल्यामुळे जिल्ह्यात अनेक पेट्रोल पंप कोरडेठाक पडलेत. त्यामुळे या पंपांवर स्टॉक नसल्याचे फलक लावण्यात आलेत. दुसरीकडे, ज्या पंपांवर इंधन उपलब्ध आहे, तिथे वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. याठिकाणी इंधन मिळण्यासाठी तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे. या परिस्थितीला कंटाळून पेट्रोल पंप चालक आपला पंप बंद ठेवण्यातच धन्यता मानत आहेत. पुण्यात मनसेच्या आंदोलनाला पोलिसांची नकारघंटा मनसेने पेट्रोल – डिझेलच्या वाढत्या दरांविरोधात पुण्यात आक्रमक भूमिका घेतली आहे. मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. मनसेचे त्यांच्यापुढे आंदोलन करण्याची योजना होती. पण पोलिसांनी त्यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली. पोलिसांनी या प्रकरणी शहरात 5 किंवा त्याहून अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घातली आहे. विशेषतः पुणे पोलिसांनी मनसे शहरप्रमुख साईनाथ बाबर यांना नोटीस बजावून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आंदोलन करू नये असा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *