कुमकुम मोहोडने जागतिक आर्चरी स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक:भारतीय महिला रिकर्व्ह संघाची शांघायमध्ये ऐतिहासिक कामगिरी

0
8b250c80-87f3-44c8-9262-da44fccc65bf_1778947352568.jpg




चीनमधील शांघाय येथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत भारतीय महिला रिकर्व्ह संघाने सुवर्णपदक जिंकले. या सुवर्णविजेत्या संघात अमरावती येथील मणीबाई गुजराती हायस्कूलची विद्यार्थिनी कुमकुम अनिल मोहोडचा समावेश आहे. कुमकुमच्या या यशामुळे अमरावती शहरासह शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कुमकुम मोहोड ही मणीबाई गुजराती हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधील इयत्ता ११ वी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी आहे. कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर हे सुवर्णपदक मिळवून शाळा, अमरावती आणि देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. कुमकुमच्या या यशामागे तिच्या आई-वडिलांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन आणि पाठबळ महत्त्वाचे ठरले आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली देव यांनी तिचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेतील आर्चरी प्रशिक्षिका स्वाती बाळापुरे यांनी कुमकुमच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे कौतुक केले. दि. गुजराती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुरेशभाई राजा यांनीही समस्त कार्यकारिणीच्या वतीने कुमकुमचे अभिनंदन केले. या ऐतिहासिक कामगिरीमुळे शाळेसह अमरावती विभागात उत्साहाचे वातावरण आहे. भारतीय महिला रिकर्व्ह संघाच्या या सुवर्ण यशामुळे देशाच्या क्रीडा क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शिक्षण विभागाच्या वतीने शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली देव यांचे स्वागत केले आणि कुमकुमच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed