समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या आंदोलनाला यश:खासदार वानखेडे, डीएचओ पारिसे यांच्या शिष्टाईने प्रश्न सुटला
![]()
अमरावती: दोन महिन्यांचे वेतन आणि नऊ महिन्यांचा प्रोत्साहन भत्ता न मिळाल्याने जिल्हाभरातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी (सीएचओ) जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले होते. खासदार बळवंतराव वानखडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. खासदार वानखडे आणि डॉ. पारिसे यांनी आंदोलनकर्त्यांची त्यांच्या मंडपात जाऊन भेट घेतली. खासदारांच्या निर्देशानुसार, आंदोलनस्थळावरूनच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट बोलणी करण्यात आली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन-तीन दिवसांत संबंधित रक्कम सीएचओंपर्यंत पोहोचेल. या यशस्वी मध्यस्थीमुळे महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेने पुकारलेले हे आंदोलन थांबवण्यात आले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सांभाळणारे सुमारे तीनशे समुदाय आरोग्य अधिकारी आहेत. त्यांना दरमहा निश्चित मानधन आणि कामाच्या गुणवत्तेनुसार प्रोत्साहन भत्ता दिला जातो. गेल्या नऊ महिन्यांपासून हा भत्ता मिळाला नव्हता, तसेच दोन महिन्यांपासून वेतनही रखडले होते. सीएचओ संघटनेचे नेते डॉ. अंकुश मानकर यांनी ही माहिती दिली. त्यांनी संघटनेच्या वतीने केलेल्या पत्रव्यवहाराची प्रतही खासदार आणि डीएचओ यांच्यासमोर सादर केली. शासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा तिढा सोडवण्यात आला. संघटनेने खासदार आणि डीएचओ यांच्या शिष्टाईबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
