शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये:चांदूरबाजारमध्ये आमदार प्रवीण तायडे यांच्या बँक अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना

0
d5dbb649-4fef-4702-b38a-5e6e78389d3a_1778946705877.jpg




चांदूरबाजार प्रतिनिधी: तालुक्यातील कोणताही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता सर्व बँकांनी घ्यावी, अशा स्पष्ट सूचना आमदार प्रवीण तायडे यांनी दिल्या. येथील तहसील कार्यालयात आयोजित पीक कर्ज आढावा बैठकीत त्यांनी बँक अधिकाऱ्यांशी संवाद साधला. ब्लॉक लेव्हल बँकर्स कमिटीच्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना आमदार तायडे म्हणाले की, पीक कर्जासाठी बँकेत येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या अडचणी समजून घेऊन त्या तत्काळ सोडवाव्यात. शेतकरी शेतीवर अवलंबून असल्याने त्यांना वेळेत पीक कर्ज मिळणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे कर्ज वाटप प्रक्रियेत कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. या बैठकीला प्रभारी तहसीलदार मनोज सोनारकर, तालुका कृषी अधिकारी प्रवीण मोहोड, मंडळ अधिकारी भारत पर्वतकर यांच्यासह तालुक्यातील विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच भाजपा तालुका अध्यक्ष रमेश तायवाडे, हर्षल धुळे आणि जिल्हा उपाध्यक्ष मुरली माकोडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत तालुक्यातील विविध बँकांनी आतापर्यंत केलेल्या पीक कर्ज वाटपाचा आढावा घेण्यात आला. यामध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शिरजगाव बंड शाखेने ११२३, घाटलाडकी शाखेने १२००, करजगाव शाखेने २५२, तोंडगाव शाखेने ४००, चांदूरबाजार शाखेने ९६६ आणि ब्राह्मणवाडा थडी शाखेने १३०० शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप केले आहे. याशिवाय, बँक ऑफ महाराष्ट्रच्या शिरजगाव कसबा शाखेने २५३, बँक ऑफ इंडियाच्या चांदूरबाजार शाखेने ११०० तर बँक ऑफ बडोदाच्या चांदूरबाजार शाखेने एक हजार शेतकऱ्यांना कर्ज वाटप केल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. यावेळी आमदार तायडे यांनी युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नावरही भर दिला. युवकांना स्वयंरोजगारासाठी मुद्रा लोन योजनेअंतर्गत अधिकाधिक कर्ज वाटप करावे, बचत गटांना प्राधान्याने कर्ज पुरवठा करावा तसेच शासनाच्या विविध योजनांमधून आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन त्यांनी बँक अधिकाऱ्यांना केले. विकास प्रक्रियेत बँकांची भूमिका महत्त्वाची असून अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे, असेही त्यांनी अधोरेखित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed