अमरावतीत परिचारिकांचे कामबंद आंदोलन सुरू:'जीएमसी'मध्ये महिला परिचारिकेवर अत्याचार; पोलिसांच्या उदासीनतेविरोधात संतापाचा उद्रेक

0
1b1fc39e-cefb-44ea-855a-2909060f821e_1778946914780.jpg




अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) एका महिला परिचारिकेवर झालेल्या अत्याचाराप्रकरणी स्थानिक पोलिस प्रशासनाने दखल न घेतल्याने महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या स्थानिक शाखेने आज, शनिवार, १६ मे पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे रुग्णालयातील रुग्णसेवा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे. संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ मे रोजी कर्तव्यावर असताना एका अज्ञात व्यक्तीने पीडित परिचारिकेचा विनयभंग करून लुटालूट केली होती. या घटनेची तक्रार पीडित परिचारिकेने दुसऱ्याच दिवशी, ७ मे रोजी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात नोंदवली होती. आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की, आरोपीची ओळख पटली असतानाही पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. पोलिस प्रशासनाच्या या उदासीन भूमिकेविरोधात संघटनेने बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. आंदोलनापूर्वी १५ मे रोजी परिचारिकांनी काळ्या फिती लावून कामकाज केले होते. आंदोलनादरम्यान, परिचारिकांनी पालकमंत्री, जीएमसीचे अधिष्ठाता, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकित्सक आणि सिटी कोतवालीचे ठाणेदार यांची स्वतंत्रपणे भेट घेऊन कारवाईची मागणी केली. त्यांनी जीएमसीच्या अधिष्ठाता यांना दिलेल्या लेखी निवेदनात स्पष्ट केले आहे की, रुग्णसेवा खंडित झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी स्थानिक प्रशासनाची राहील. दरम्यान, या मुद्द्यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी इर्विन, डफरीन आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील परिचारिकांनीही आंदोलनाची हाक दिली आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनने ११ मे रोजी आरोग्य उपसंचालकांना पत्र पाठवून १७ मे पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास १८ मे रोजी कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed