ठाणगाव परिसरामध्ये कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांचे हाल:भाजपच्या वतीने‎ महावितरणला निवेदन‎

0
app_17788460286a07094cf40be_1001473203.jpg




ठाणगाव आणि परिसरातील गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अघोषित लोडशेडिंग आणि कमी दाबाने होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या गंभीर समस्येची दखल घेत भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या (महावितरण) सिन्नर विभाग कार्यालयावर धडक दिली. यावेळी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन वीज पुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली. ठाणगाव परिसरात वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. विजेच्या लपंडावामुळे घरातील विद्युत उपकरणांचे नुकसान होत असून, कमी दाबाच्या पुरवठ्यामुळे शेतीपंप आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी वीज गायब होण्याचे प्रमाण वाढल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. दैनंदिन कामकाजावर याचा विपरीत परिणाम होत असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने पहावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. गावातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासोबतच, जर लोडशेडिंग अनिवार्य असेल, तर त्याचे निश्चित आणि नियोजनबद्ध वेळापत्रक जाहीर करावे, जेणेकरून नागरिकांना पूर्वकल्पना मिळेल, असे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. महावितरणच्या सहायक अभियंता हेमंगी पवार यांनी हे निवेदन स्वीकारले असून, ठाणगाव परिसरातील वीज पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याचे आश्वासन दिले आहे.याप्रसंगी ज्येष्ठ नेते जयंत (बाबूजी) आव्हाड, तालुका सरचिटणीस रामदास भोर, प्रमोद उगले, उपसरपंच विलास मोरे, सुभाष शिंदे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.प्रशासनाने या मागणीची दखल न घेतल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे. यामुळे आता महावितरण यावर काय ठोस पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed