वाचनातून समृद्ध झालेला माणूसच अभिनयाला खरी उंची देतो- सोमण:अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाच्या वसंत व्याख्यानमालेचे थाटात उद्घाटन
![]()
पुस्तकांचे वाचन माणसाला वैचारिक प्रगल्भता देते, तर अभिनयाच्या क्षेत्रात काम करताना होणारे माणसांचे वाचन जीवनाला खऱ्या अर्थाने समृद्ध करते. जो कलाकार साहित्याचा व्यासंग ठेवतो आणि अवतीभवतीच्या माणसांचे वाचन करायला शिकतो, तोच अभिनयातून उत्तमोत्तम भूमिका जिवंत करू शकतो, असे प्रतिपादन प्रसिद्ध चित्रपट व नाट्य अभिनेते योगेश सोमण यांनी केले. अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाच्या वतीने आयोजित ऐतिहासिक वसंत व्याख्यानमालेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. “माझ्या भूमिकेने मला काय दिले’ या विषयावर व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना त्यांनी “वाचन आणि भूमिकांचा संबंध’ यावर रसिक नगरकरांशी संवाद साधला. व्यासपीठावर उद्घाटक तथा जिल्हा ग्रंथालय निरीक्षक रामदास शिंदे, वाचनालयाचे कार्यवाह विक्रम राठोड, उपाध्यक्ष दिलीप पांढरे, मसापचे जिल्हाध्यक्ष जयंत येलुलकर, संचालिका प्रा. ज्योती कुलकर्णी, संयोजिका शिल्पा रसाळ, वैद्य राजा ठाकूर, किरण आगरवाल, राहुल तांबोळी, कवी चंद्रकांत पालवे, ग्रंथपाल अमोल इथापे, नितीन भारताल व पल्लवी कुक्कडवाल उपस्थित होते. पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन मानवी स्वभावाचे वाचन करण्याच्या महत्त्वावर बोलताना सोमण म्हणाले, “लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय या सिनेसृष्टीतील सर्वच टप्प्यांत वाचनाचा पाया महत्त्वाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक आणि चाणक्य या महापुरुषांच्या भूमिका करताना त्यांच्यावरील साहित्याचा सखोल अभ्यास व वाचन करावे लागले. या अभ्यासातूनच अभिनयाच्या क्षमता निर्माण होत गेल्या. वेगवेगळ्या माध्यमांत काम करताना प्रेक्षकांच्या मानसिकतेचे वाचन करणेही तितकेच गरजेचे असते.’ हिंदी व मराठी सिनेसृष्टीतील अनुभवांचा वेध घेत त्यांनी वाचनामुळे प्रगती कशी सोपी होते, हे स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, संतश्रेष्ठ तुकारामांच्या ‘आनंद डोह’ या प्रयोगाचे सादरीकरण आणि त्यानिमित्ताने झालेले वाचन हा एक चमत्कार होता. या साहित्याने माझ्यातील अहंकार गळून पडला आणि व्यक्तिमत्त्वाला नवी स्निग्धता मिळाली. यावेळी उद्घाटक रामदास शिंदे यांनी, जिल्हा वाचनालयाची व्याख्यानमाला ही पुस्तकांप्रमाणेच उत्तुंग व्यक्तिमत्त्वांचे विचार वाचण्याची आणि माणूस घडवण्याची अखंड यात्रा असल्याचे सांगितले. प्रास्ताविक व आभार प्रा. ज्योती कुलकर्णी यांनी मानले, तर परिचय शिल्पा रसाळ यांनी करून दिला. साहित्य व नाट्य क्षेत्रातील रंगकर्मींचा गौरव व्याख्यानमालेच्या उद्घाटनाचे औचित्य साधून प्रसिद्ध सिनेकलाकार मोहनिराज गटणे, ज्येष्ठ रंगकर्मी पी. डी. कुलकर्णी आणि म.सा.प.च्या विभागीय कार्यवाहपदी निवड झाल्याबद्दल जयंत येलुलकर यांचा जिल्हा वाचनालयाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. या सोहळ्याला अहिल्यानगरमधील असंख्य रसिक उपस्थित होते.
