रोहित पवारांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना थेट आव्हान:28 तारखेपर्यंत CBI चौकशी द्या; मित्रपक्ष की अजगरी वृत्ती? सरकारला इशारा

0
2-photo-12_1778734233.png




राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून राज्य सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे म्हणजेच सीबीआयकडे देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी पुन्हा लावून धरली आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र आणि स्मरणपत्र दिल्याचा उल्लेख करत रोहित पवार यांनी आता थेट आव्हानच दिले आहे. येत्या 28 तारखेपर्यंत हा तपास सीबीआयकडे सोपवण्यास मित्रपक्षाला भाग पाडावे, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे. रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, अजित पवार यांच्या निधनाला आता जवळपास चार महिने पूर्ण होत आले आहेत. मात्र इतका कालावधी उलटूनही तपास सीबीआयकडे देण्याबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. अधिवेशनात हा मुद्दा मांडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचे सांगितले होते, पण प्रत्यक्षात काहीच घडले नाही, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे आता सरकारची भूमिका संशयास्पद वाटत असल्याचेही त्यांनी सूचित केले. यावेळी रोहित पवार यांनी मित्रपक्षाच्या भूमिकेवरही थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मित्रपक्ष हा खरोखर मित्र आहे की मित्रपक्षालाच गिळणारी अजगरी वृत्ती आहे, हे आता स्पष्ट होईल, अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला. सुनेत्रा पवार यांनी या प्रकरणात पुढाकार घेऊन दबाव आणावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या कार्यशैलीची आठवण करून देत भावनिक भाष्यही केले. अजितदादा हे चार-दोन महिन्यांत लोक विसरतील असे नेते नव्हते, असे ते म्हणाले. सर्वांना न्याय देणारा आणि काम करणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. त्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबत सत्य बाहेर येणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यातील जनतेचे लक्ष आता या तपासाकडे लागले असून अजित पवारांना न्याय कधी मिळणार, हा प्रश्न कायम असल्याचे त्यांनी म्हटले. रोहित पवार यांची पोस्ट देखील पहा…. अजितदादांच्या विमान अपघाताचा तपास CBI कडं देण्याबाबतचं पत्र आणि नंतर स्मरणपत्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकींनी त्यांच्या मित्रपक्षाचे नेते तथा मुख्यमंत्री आणि अजितदादांचे ‘मित्र’ फडणवीस साहेबांना दिलं होतं. नंतर अधिवेशनातही हा मुद्दा आम्ही मांडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यावर सकारात्मक उत्तरही दिलं. पण अजितदादांना जाऊन येत्या २८ तारखेला ४ महिने होतायत, तरी अद्यापही हा तपास CBI कडं दिलेला नाही. त्यामुळं माझं सुनेत्राकाकींना आवाहन आहे म्हणा, आव्हान (Challenge) आहे म्हणा किंवा विनंती आहे म्हणा… की त्यांनी येत्या २८ तारखेपर्यंत हा तपास CBI कडं देण्यास त्यांच्या मित्रपक्षाला भाग पाडावं. यानिमित्ताने त्यांचा मित्रपक्ष हा खरंच मित्र आहे की मित्रपक्षालाच गिळणारा अजगरी वृत्तीचा आणखी कुणी आहे, हे स्पष्ट होईल. अजितदादा हे चार-दोन महिन्यात लोकं विसरुन जातील, असे नेते नक्कीच नव्हते… सर्वांना न्याय देणारा हा ‘कामाचा माणूस’ होता आणि त्यांना न्याय कधी मिळणार, याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. यासाठी अजितदादांनी निवडून आणलेल्या पण आज ‘विकास’ निधी मिळवण्यासाठी व्यस्त असलेल्या त्यांच्या पक्षाच्या १०० टक्के आमदारांनी वेळात वेळ काढून याबाबत पाठपुरावा करायलाही हरकत नाही. शिवाय आमच्या पातळीवर आम्ही प्रयत्न करतच आहोत, पण सगळ्या यंत्रणा हाती असलेल्या सरकारचीही काही जबाबदारी आहे की नाही? हे सरकार अजून किती दिवस लोकांना वेड्यात काढणार? एक दिवस उत्तर द्यावंच लागेल अन्यथा लोकंच उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed