आईला त्रास देणाऱ्या मद्यपी भावाचा लोखंडी रॉडने वार करत खून:हिंगोलीच्या वसमतमधील घटना, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात

0
whatsapp-image-2026-05-14-at-93731-am_1778733269.jpeg




वसमत येथे जयनगर भागात दारु पिऊन आईला त्रास देणाऱ्या भावाचा लोखंडी रॉडने वार करून खून केल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी भावासह आईवर वसमत शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. 14 पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात आधी पायऱ्यावरून पडल्याची माहिती दिली होती. मात्र पोलिसांनी अधिक तपास करताच खूनाचा उलगडा झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत येथील जयनगर भागात प्रविण रामराव गाडेकर (38) हे त्याच्या आई सोबत राहात होते. त्यांचे पत्नीसोबत पटत नसल्याने पत्नी मुलांना घेऊन बाहेरगावी राहते. त्यामुळे प्रविण व त्यांची आई दोघेच घरी राहतात. तर एक भाऊ माधव गाडेकर हा पुणे येथे कुटुंबासह राहतो. दरम्यान, पुणे येथे राहणारा माधव हा मुलीच्या शिक्षणासाठी प्रमाणपत्र काढण्यासाठी वसमत येथे आला होता. सोमवारी ता. 11 दुपारी प्रविण दारु पिऊन घरी आला. यावेळी तो आईला भांडत होता. सदर प्रकार पाहिल्यानंतर माधव याने प्रविण यांच्या पायावर, हातावर व छातीवर लोखंडी पाईपने वार केले. यामध्ये गंभीर जखमी होऊन प्रविण यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे माधव व त्याचाई आई सिताबाई दोघेही घाबरून गेले. या घटनेची माहिती सिताबाई यांनी वसमत शहर पोलिस ठाण्यात दिली. यामध्ये प्रविण हे पायऱ्यावरून घसरून पडल्याने मयत झाल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, उपनिरीक्षक साहेबराव कसबेवाड, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बालाजी मिरासे, जमादार गजानन भोपे, बंदूके यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी मयत प्रविण यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. उत्तरीय तपासणीच्या अहवालात प्रविणच्या अंगावर जखमा असल्याचे दिसून आले. यामुळे संशय आल्याने पोलिसांनी माधव यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने खूनाचा कबुली दिली. मयत प्रविण हा आईला त्रास देत असल्याने त्याचा खून केल्याचे त्याने प्राथमिक चौकशीत पोलिसांना सांगितले. या प्रकरणी उपनिरीक्षक कसबेवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी माधव गाडेकर व त्याची आई सिताबाई गाडेकर यांच्या विरुध्द खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी माधव यास ताब्यात घेतले आहे. पोलिस निरीक्षक वाघ, उपनिरीक्षक कसबेवाड पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed