NEET पेपरफुटी प्रकरण: CBI ॲक्शन मोडवर!:पुण्यातून दोघांना मुसक्या आवळल्या, तर नाशिकमध्येही धाडसत्र

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-05-13t223033069_1778691688.jpg




देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने आपल्या तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली असून, आज पुण्यातून दोघांना ताब्यात घेतले आहे. पुण्यातील बिबवेवाडी भागातून एका महिलेला अटक केल्यानंतर, सीबीआयने लगेचच फुरसुंगी येथून आणखी एका संशयित तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहेत. एका बाजूला पुण्यात ही धडक कारवाई सुरू असतानाच, दुसरीकडे नाशिकमध्येही तपासाला वेग आला असून पोलिस व सीबीआयच्या पथकाकडून आरोपी शुभम खैरनार याच्या घराची कसून झाडाझडती घेतली जात आहे. तसेच या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी सीबीआयने शुभमच्या भावालाही ताब्यात घेतले आहे. नीट 2026 परीक्षेचा पेपर फुटल्याचे निष्पन्न झाल्याने नॅशनल टेस्टिंग एजन्सीने 3 मे रोजी झालेली परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला असून, या गैरव्यवहाराचा तपास आता सीबीआयने आपल्या हाती घेत कारवाईचा वेग वाढवला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे नाशिकपाठोपाठ आता पुण्यातही सापडले असून, पुणे पोलिसांनी बिबवेवाडी परिसरातून मनीषा वाघमारे या महिलेसह एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मनीषा वाघमारे हिने विद्यार्थ्यांना मुख्य आरोपींपर्यंत पोहोचवण्यासाठी मध्यस्थ म्हणून काम केल्याचा पोलिसांना संशय असून, या अटकेमुळे नीट पेपरफुटीतील पुणे कनेक्शन आणि त्यामागील मोठी साखळी उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फुरसुंगी येथून आणखी एक संशयित ताब्यात नीट पेपरफुटी प्रकरणातील कारवाईची व्याप्ती वाढवत पुणे पोलिसांनी फुरसुंगी येथून आणखी एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले आहे. हा तरुण अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पोलिसांकडून या विद्यार्थ्याची कसून चौकशी सुरू असून, अद्याप त्याच्याकडून कोणतीही ठोस माहिती हाती लागलेली नसली तरी, या प्रकरणाच्या पुढील सखोल तपासासाठी त्याला लवकरच सीबीआयच्या हवाली केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शुभम खैरनारच्या कुटुंबाची चौकशी नीट परीक्षा गैरप्रकाराचा तपास करणाऱ्या सीबीआयने आता आपला मोर्चा नाशिककडे वळवला असून संशयित आरोपी शुभम खैरनारच्या नांदगाव येथील निवासस्थानी आज नाशिक गुन्हे शाखेसह संयुक्तपणे मोठी झाडाझडती घेतली. सुमारे सात ते आठ अधिकाऱ्यांच्या या पथकाने, ज्यात एका महिला अधिकाऱ्याचाही समावेश होता, अत्यंत गोपनीयता पाळत खैरनार कुटुंबाची तासभर कसून चौकशी केली. या कारवाईदरम्यान शुभमचा भाऊ भावेश खैरनार याला पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले असून, घराची झडती आणि प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्याला सोडून देण्यात येणार असल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed