अमरावतीत एमडी ड्रग्जची पुन्हा मोठी कारवाई:विलास नगरमध्ये ४.०५ लाखांचे ड्रग्ज जप्त, एकाला अटक

0
081f2d1d-a304-4d3f-9a23-8a63efb1e99f_1778686162560.jpg




अमरावती शहर गुन्हे शाखेने गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील साहूबाग-विलास नगर परिसरात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ लाख ५ हजार रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त केले असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी इलियासअली मेहबूब अली (वय ४०, रा. अन्सारनगर, वाडी गवळीपुरा, अमरावती) या आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २७ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला, ज्याची अंदाजे किंमत ४ लाख ५ हजार रुपये आहे. याव्यतिरिक्त, आरोपीकडून ६० हजार रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची एक्टिवा मोपेडही जप्त करण्यात आली. अशा प्रकारे पोलिसांनी एकूण ४ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. पोलीस आयुक्त राकेश ओला, उपायुक्त गणेश शिंदे आणि श्याम घुगे, तसेच सहायक पोलिस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक दशरथ आडे, पोलिस उपनिरीक्षक अजय मिश्रा, सहायक पोलिस उपनिरीक्षक सुधीर गुडधे व संदीप खंडारे, पोलिस अंमलदार संभाजी केंद्रे, सागर ठाकरे, सूरज चव्हाण, चेतन कराडे, निखील गेडाम, योगेश पवार यांनी ही कारवाई यशस्वी केली. अमरावतीत गेल्या काही महिन्यांपासून एमडी ड्रग्जची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे. वारंवार कारवाया होऊनही हा मुद्दा पूर्णपणे संपुष्टात आलेला नाही. विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान विधानपरिषद सदस्य संजय खोडके यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला होता. तरुण पिढीला बरबाद करण्याचे हे षडयंत्र हाणून पाडण्याची मागणी त्यांनी त्यावेळी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed