Ahilyanagar NEET Paper Leak Arrest; CBI Action Maharashtra
![]()
देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘नीट २०२६’ (NEET) पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे अहिल्यानगरपर्यंत पोहोचले आहेत. सीबीआयने आज सकाळी याप्रकरणी अहिल्यानगर येथे छापेमारी केली. त्यात त्यांनी धनंजय लोखंडे या आणखी एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. पुण्यात
.
पोलिस तपासात धनंजय लोखंडेचे शेवटचे लोकेशन पुण्यात दिसून आले होते. मात्र, पोलिसांच्या छाप्याची कुणकुण लागताच त्याने तिथून पळ काढला आणि तो अहिल्यानगरमध्ये आश्रयाला आला. विशेष तपास पथक आणि स्थानिक पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे तांत्रिक विश्लेषण करत त्याला ताब्यात घेतले आहे. सध्या लोखंडेची कसून चौकशी सुरू असून, या पेपरफुटीच्या रॅकेटचे जाळे नेमके कुठपर्यंत पसरले आहे, याचा छडा लावला जात आहे. लवकरच त्याला संबंधित मुख्य तपास यंत्रणेच्या ताब्यात दिले जाण्याची शक्यता आहे.
पुण्यातून एक महिला ताब्यात
या प्रकरणी पुणे पोलिसांनी देखील बिबवेवाडी परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतले आहे. मनिषा वाघमारे असे या महिलेचे नाव असून, तिचे फोन, लॅपटॉप आणि अन्य तांत्रिक उपकरणे सीझ केली आहेत. मनिषा ही अहिल्यानगरमधून ताब्यात घेतलेल्या धनंजय लोखंडे याच्याशी सतत संपर्कात होती, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. मनिषा आणि धनंजय यांच्यात झालेले WhatsApp चॅट्स आणि कॉल्स पोलिसांच्या हाती लागले आहेत. पेपरफुटीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतरही हे दोघे एकमेकांच्या संपर्कात होते, असे तपासात समोर आले आहे.
शुभम खैरनारला दोन दिवसांची ट्रान्झिट रिमांड
दरम्यान, NEET-UG 2026 परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी संशयित असलेला शुभम खैरनार याला दोन दिवसांची ‘ट्रान्झिट रिमांड’ (हस्तांतरण कोठडी) मंजूर करण्यात आली आहे. मुंबईतील किल्ला न्यायालयाने CBI ला खैरनारला तपासासाठी दिल्लीला नेण्याची परवानगी दिली आहे. उद्या, १४ मे रोजी त्याला दिल्लीतील CBI न्यायालयात हजर केले जाईल. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी खैरनारची कोठडी आवश्यक असल्याचे CBI ने नमूद केले आहे. शुभम खैरनारला काल नाशिक पोलिसांनी अटक केली होती.
पैशांची बोली आणि ‘गेस पेपर’चा बनाव
३ मे रोजी झालेल्या नीट परीक्षेचा पेपर फुटल्याचे सिद्ध झाल्याने नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) ही परीक्षा आधीच रद्द केली आहे. तपासात समोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार, परीक्षेच्या एक महिना आधीच राजस्थानमधील सिकर सारख्या कोचिंग हबमध्ये हा पेपर पोहोचला होता. परीक्षेच्या आदल्या रात्री हा पेपर ७ लाख ३० हजार रुपयांना विद्यार्थ्यांना विकला गेल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, एका कथित ‘गेस पेपर’मधील रसायनशास्त्राचे (Chemistry) १२० प्रश्न आणि जीवशास्त्राचे (Biology) अनेक प्रश्न मूळ प्रश्नपत्रिकेशी जसेच्या तसे जुळले होते.
तीन राज्यांत तपासाचे चक्र; मास्टरमाइंड ताब्यात
या प्रकरणाचा तपास आता महाराष्ट्र, राजस्थान आणि उत्तर प्रदेश अशा तीन राज्यांपर्यंत विस्तारला आहे. जयपूरमधून या प्रकरणाचा ‘मास्टरमाइंड’ मनिष यादव याला आधीच ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच नाशिकमधून संशयित डॉ. शुभम मधुकर खैरनार यांस पोलिसांनी ताब्यात घेतले होते. धनंजय लोखंडे हा शुभम खैरनार या तरुणाचा मित्र असल्याची माहिती आहे. हा तरुण कोण आहे? हे अद्याप पोलिसांनी सांगितले नाही. यासंबंधीची माहिती सीबीआयद्वारे दिली जाणार आहे. या मोठ्या रॅकेटमध्ये आणखी काही नामांकित कोचिंग क्लासेसचे संचालक किंवा मध्यस्थांचा सहभाग असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुन्हा परीक्षेचे सावट; २२ लाख विद्यार्थी चिंतेत
पेपरफुटीमुळे २२ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. एनटीएने नवीन परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, असे म्हटले असले तरी विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. राजस्थानातील स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप (SOG) या प्रकरणात अनेक ठिकाणी छापे टाकत असून, महाराष्ट्रातील या ताज्या अटकेमुळे पेपरफुटीच्या आंतरराज्यीय नेटवर्कचा पर्दाफाश होण्याची अपेक्षा आहे.
NEET पेपरफुटीचे लातूर कनेक्शन?:42 प्रश्न जुळल्याच्या दाव्यानंतर क्लासेसचे संचालक चौकशीच्या फेऱ्यात; तक्रारीनंतर पोलिसांचा तपास वेगात
देशभरात गाजत असलेल्या NEET (UG) 2026 पेपरफुटी प्रकरणात आता लातूरचे नाव पुढे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिकनंतर आता लातूरमधील एका खासगी क्लासेसची चौकशी सुरू करण्यात आली असून, एका विद्यार्थिनीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीमुळे या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. मॉक टेस्टमध्ये विचारलेले 42 प्रश्न प्रत्यक्ष NEET परीक्षेत जशाच्या तसे आल्याचा गंभीर दावा या तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित क्लासेसचा पेपरफुटीशी काही संबंध आहे का, याचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे. या घडामोडींमुळे राज्यभरात मोठी चर्चा रंगली असून विद्यार्थ्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. सविस्तर वाचा…
