दोन व्यक्तीं कडून १ लाख १९ हजारांचा विदेशी दारूसाठा जप्त
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५४१/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ), ६५ (ई) व ८३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई मारोती शंकर पंचलिंग, नेमणूक पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण यांनी फिर्याद दिली आहे. पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, दिनांक १२ मे २०२६ रोजी दुपारी १.१० वाजताच्या सुमारास कृषी उद्योग गेटजवळ, चंदासिंग कॉर्नरकडे जाणाऱ्या रोडवर छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान दोन संशयित इसमांना ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत
१) पल्ले स्वामी गोंड (वय ४१), व्यवसाय मजुरी, रा. मचारेड्डी फरीदपेट, जिल्हा निजामाबाद, तेलंगणा
२) यादगीर नारायण परकी (वय ४६), व्यवसाय मजुरी, रा. पेदा गंडलेल्ली, जिल्हा सिद्धीपेट, तेलंगणा
आरोपींकडून विदेशी दारूच्या १८० एमएलच्या एकूण १९८ बाटल्या तसेच एक स्कुटी असा एकूण १ लाख १९ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या देखरेखीखाली पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर, पोलीस उपनिरीक्षक व्यंकट कुसमे, वसंत केंद्रे, विनोद पवार, मारोती पंचलिंग, शंकर माळगे, समीर अहमद, धर्मपाल कांबळे आदींच्या पथकाने ही धडक कारवाई पार पाडली. दरम्यान, अवैध दारू विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे
