[ads1]
![]()
लाडकी बहीण’ योजनेतून महिलांना आर्थिक मदत देणाऱ्या सरकारच्या एसटी प्रवासातील सवलतीला आता एनसीएमसी कार्डच्या सक्तीमुळे अडथळा निर्माण झाला आहे. 1 सप्टेंबरपासून एनसीएमसी कार्ड अनिवार्य केल्यानंतर राज्यभरातील अनेक महिलांना कार्ड नसल्याने चक्क पूर्ण तिकीट काढावे लागल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. ज्येष्ठ आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांनाही या नव्या व्यवस्थेचा फटका बसला असून, अनेक एसटी आगारांमध्ये पहिल्याच दिवसापासून गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय सामान्य गतिशीलता कार्ड अर्थात एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, नवीन व्यवस्था सुरू होताच सर्व्हरवरील ताण, नेटवर्कच्या अडचणी आणि कार्ड उपलब्ध नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. अनेक ठिकाणी सवलतीच्या तिकिटासाठी आलेल्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण भाडे भरावे लागल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. एनसीएमसीच्या गोंधळात महिला-ज्येष्ठांची गैरसोय राज्य शासनाच्या विविध योजनांनुसार एसटी प्रवासात महिलांना तसेच 65 ते 75 वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात सवलत दिली जाते. तर 75 वर्षांवरील अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठीही विशेष प्रवास सवलतीची व्यवस्था आहे. आता या सवलतीच्या तिकिटांसाठी एनसीएमसी कार्डची अट लागू करण्यात आली आहे. मात्र, ही व्यवस्था लागू होण्यापूर्वीच सर्व प्रवाशांपर्यंत कार्ड पोहोचले नसल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. महामंडळाच्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे 1.11 कोटी प्रवाशांनी एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी केली आहे. मात्र, नोंदणी करूनही अनेकांच्या हातात अद्याप प्रत्यक्ष कार्ड आलेले नाही. कार्ड कधी मिळणार, कुठे मिळणार आणि त्याचे रिचार्ज नेमके कसे करायचे, याबाबतही अनेक प्रवाशांमध्ये संभ्रम आहे. परिणामी, सवलतीच्या प्रवासासाठी आलेल्या काही महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण तिकीट काढावे लागल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. या गोंधळाची दखल घेत राज्य परिवहन महामंडळाने अखेर तातडीने पावले उचलली आहेत. महाव्यवस्थापक (वाहतूक) नितीन मैंद यांच्या स्वाक्षरीने परिपत्रक काढून एनसीएमसी कार्डच्या सक्तीबाबत सहा महत्त्वाच्या बाबींमध्ये तात्पुरती शिथिलता जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्व विभागीय नियंत्रकांना देण्यात आले आहेत. एसटीकडून प्रवाशांना सहा मोठे दिलासे 01 ज्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी आधीच ऑनलाइन पद्धतीने एसटीचे आरक्षण केले आहे, त्यांना एनसीएमसी कार्ड नसले तरी आरक्षित तिकिटावर सवलतीचा प्रवास करता येणार आहे. 02 एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी केली आहे; मात्र प्रत्यक्ष कार्ड अद्याप मिळालेले नाही, अशा प्रवाशांना नोंदणीची पावती दाखवून 30 सप्टेंबरपर्यंत सवलतीच्या तिकिटावर प्रवास करता येणार आहे. 03‘एसटी संगे तीर्थाटन’ योजनेअंतर्गत प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी 12 सप्टेंबरपर्यंत जुनी सवलत पद्धत कायम ठेवण्यात आली आहे. 04 गणेशोत्सवाच्या काळात करण्यात आलेल्या गट आरक्षणासाठी एनसीएमसी कार्डची सक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे गटाने प्रवास करणाऱ्या भाविकांना दिलासा मिळाला आहे. 05 अनेक आगारांमध्ये सर्व्हरवर ताण येत असल्याने आणि तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने 14 सप्टेंबरपर्यंत कागदी स्वरूपातील सवलतीची तिकिटे वैध राहणार आहेत. 06 ज्या प्रवाशांकडे सक्रिय एनसीएमसी कार्ड आहे, त्यांना कार्डच्या माध्यमातून सवलतीचे तिकीट देण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. सर्व्हर डाऊन, रिचार्जवरूनही संभ्रम एनसीएमसी कार्ड सक्तीच्या निर्णयानंतर पहिल्याच दिवसापासून अनेक एसटी आगारांमध्ये इंटरनेट आणि सर्व्हरशी संबंधित अडचणी निर्माण झाल्या. कार्ड तपासणी आणि तिकीट देण्याच्या प्रक्रियेत विलंब होत असल्याने तिकीट खिडक्यांवर मोठ्या रांगा लागल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. याशिवाय, एनसीएमसी कार्ड रिचार्ज नेमके कुठे करायचे, याबाबतही प्रवाशांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. काही ठिकाणी प्रवाशांना अधिकृत एजंटकडे रिचार्जची सुविधा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. मात्र, संबंधित एजंटांनी रिचार्जची सुविधा एसटीच्या वाहकांकडे असल्याचे सांगितल्याच्या तक्रारी आहेत. प्रत्यक्षात अनेक वाहकांकडे कार्ड रिचार्ज करण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांची आणखी धावपळ झाली. तिकीट काढण्यासाठी आणि रिचार्जसाठी प्रवाशांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले जात असल्याने अनेक ठिकाणी संतापाचे वातावरण निर्माण झाले. विशेषतः ग्रामीण भागातून येणाऱ्या महिला आणि वयोवृद्ध नागरिकांना या नवीन व्यवस्थेमुळे अधिक त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून आले. अनेकांनी वेळेवर प्रवास करण्यासाठी अखेर पूर्ण तिकीट काढल्याचेही सांगितले. एकीकडे एसटी महामंडळाने डिजिटल आणि आधुनिक तिकीट व्यवस्थेच्या दिशेने पाऊल टाकले असले, तरी दुसरीकडे नवीन प्रणाली लागू करण्यापूर्वी आवश्यक तांत्रिक सुविधा आणि जनजागृती पुरेशी झाली नसल्याची टीका प्रवाशांकडून होत आहे. एनसीएमसी कार्डची सक्ती करण्यापूर्वी सर्व प्रवाशांना कार्ड उपलब्ध करून देणे, रिचार्जची स्पष्ट व्यवस्था करणे आणि सर्व्हरची क्षमता वाढवणे आवश्यक असल्याची मागणी आता जोर धरत आहे. सध्या एसटी महामंडळाने जाहीर केलेल्या तात्पुरत्या शिथिलतेमुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी, एनसीएमसी कार्डच्या अंमलबजावणीतील तांत्रिक गोंधळ आणि रिचार्ज व्यवस्थेतील संभ्रम पूर्णपणे दूर कधी होणार, याकडे राज्यभरातील लाखो प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा.. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 6 वा दिवस:बीडच्या आंदोलकाचा हृदयविकाराने मृत्यू; धाराशिव अन् परभणी जिल्ह्यात कडकडीत ‘बंद’ सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासह विविध मागण्यांसाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा बांधव आंतरवाली सराटीत दाखल होत असतानाच, गुरुवारी एक दुर्दैवी घटना घडली. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या बीड जिल्ह्यातील एका मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.सविस्तर वाचा..
[ads2]
एनसीएमसीचा गोंधळ! महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण तिकीट:सर्व्हर-रिचार्जच्या गोंधळानंतर एसटीची अखेर तात्पुरती सूट
















Leave a Reply