घरकुलाच्या पाहणी अहवालावर स्वाक्षरीसाठी लाच:सवना येथील ग्रामसेवकास अडीच हजार घेताना पकडले, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

0
whatsapp-image-2026-05-13-at-31306-pm_1778667088.jpeg




सेनगाव तालुक्यातील सवना येथील ग्रामसेवकास घरकुलाच्या चौकशी पाहणी अहवालावर स्वाक्षरीसाठी अडीच हजाराची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी ता. १३ दुपारी गोरेगाव चौफुली येथे रंगेहाथ पकडले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील सवना येथील एका लाभार्थ्याला घरकुल मंजूर झाले होते. या घरकुलाच्या पाहणीचा अहवाल ग्रामसेवकाच्या स्वाक्षरीने पुढे पाठविणे आवश्‍यक होते. त्यासाठी तक्रारदाराने ग्रामसेवक रामप्रसाद खिल्लारी याच्याकडे प्रस्ताव सादर करून पाठपुरावा सुरु केला होता. मात्र रामप्रसाद याने स्वाक्षरी देण्यास टाळाटाळ सुरु केली होती. त्यानंतर त्याने तक्रारदाराकडे तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र तडजोडी नंतर अडीच हजार रुपये देण्याचे ठरले होते. या प्रकरणात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. सदर रक्कम आज देण्याचे ठरले होते. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधिक्षक विकास घनवट, पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू, सुलभा राऊत, उपनिरीक्षक विजय शुक्ला, जमादार शेख अकबर, शेख शकील, रवींद्र वरणे, विनोद पुंडगे, गोविंद शिंदे, गजानन पवार, वाघ यांच्या पथकाने गोरेगाव चौफुली येथे सापळा रचला होता. दरम्यान, दुपारच्या सुमारास रामप्रसाद याने तक्रारदाराकडून अडीच हजार रुपयांची लाच स्विकारताच लाचलुचपतच्या पथकाने ग्रामसेवक रामप्रसाद खिल्लारी यास रंगेहात पकडले. याप्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे ग्रामसेवक संघटनेमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed