राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून तटकरे-पटेल गायब:जनरल सेक्रेटरी म्हणून पार्थ आणि जय पवारांचा समावेश; अखेर सुनेत्रा पवारांचं स्पष्टीकरण
![]()
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या नव्या यादीवरून राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या कार्यकारिणीच्या पत्रात पक्षातील ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांची नावे नसल्याचे समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना सुरुवात झाली. सोशल मीडियावर ही यादी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत बदल सुरू असल्याच्या चर्चांनाही उधाण आले. मात्र या सर्व घडामोडींवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्पष्टीकरण देत यादीत तांत्रिक आणि लिपिकीय चूक झाल्याचे स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 29 एप्रिल रोजी राष्ट्रीय कार्यकारिणी आणि पदाधिकाऱ्यांची माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केल्याचे पत्र समोर आले. या यादीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांचे नाव असून, जनरल सेक्रेटरी म्हणून पार्थ पवार आणि जय पवार यांचा समावेश असल्याचे दिसून आले. मात्र पक्षाचे महत्त्वाचे नेते प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांची नावे अनुपस्थित असल्याने पक्षांतर्गत समीकरणांबाबत चर्चांना वेग आला. विशेष म्हणजे, या यादीमुळे अजित पवार गटात मोठे बदल होणार का, असा सवालही उपस्थित केला जात आहे. व्हायरल झालेल्या या पत्रानंतर सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत परिस्थिती स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. माध्यमांमध्ये फिरत असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत तांत्रिक चूक असून ती लवकरच दुरुस्त करण्यात येईल, असे त्यांनी म्हटले. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करण्यात आला असला, तरी या यादीने राष्ट्रवादीतील अंतर्गत हालचाली पुन्हा चर्चेत आणल्या आहेत. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची नावे यादीतून गायब होणे ही साधी चूक आहे की त्यामागे अन्य काही राजकीय गणित आहे, याबाबत तर्क सुरू आहेत. दरम्यान, बारामतीच्या राजकारणातही नव्या घडामोडींची चर्चा रंगू लागली आहे. 2029 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा ‘पवार विरुद्ध पवार’ अशी लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कुटुंबातील सदस्यांकडून सार्वजनिकरीत्या असे होणार नसल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात पवार कुटुंबातील तिसरी पिढी बारामतीत सक्रिय होताना दिसत आहे. त्यामुळे पुढील राजकीय संघर्षाची बीजे आतापासूनच रोवली जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युगेंद्र पवार हे बारामती मतदारसंघात सातत्याने दौरे करत आहेत. गावोगावी भेटीगाठी घेऊन स्थानिक प्रश्न सोडवण्यावर त्यांचा भर असल्याचे दिसत आहे. जो लोकांचे प्रश्न सोडवेल, त्यालाच बारामतीची जनता साथ देईल, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यामुळे 2024 प्रमाणेच 2029 मध्येही ते निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे. दुसरीकडे अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनीही बारामतीत सक्रियता वाढवली आहे. जनता दरबार, नुकसानीची पाहणी आणि नागरिकांच्या अडचणी सोडवण्याच्या माध्यमातून त्यांनीही आपली उपस्थिती ठळक केली आहे. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवरून वाद याशिवाय रोहित पवार यांच्या नावाचीही बारामतीच्या राजकारणात चर्चा होत आहे. कर्जत-जामखेडमध्ये आपला राजकीय जम बसवलेल्या रोहित पवार यांची बारामतीतूनही सक्रिय होण्याची इच्छा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी काळात बारामतीत पवार कुटुंबातील विविध चेहरे एकमेकांसमोर उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवरून सुरू झालेला वाद आता थेट बारामतीच्या भविष्यातील राजकीय समीकरणांपर्यंत पोहोचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
