राज्यात पुन्हा राजकीय हालचालींना वेग:विधान परिषदेच्या 17 रिक्त जागांसाठी निवडणुका; पावसाळी अधिवेशनाआधी मोठी घडामोड
![]()
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर आता विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून येणाऱ्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी पुढील आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या अडीच वर्षांपासून या जागा रिक्त असल्याने विधान परिषदेतील सदस्यसंख्येवर त्याचा परिणाम झाला होता. मात्र आता आवश्यक अटी पूर्ण झाल्यामुळे निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत न झाल्यामुळे अनेक मतदारसंघांतील विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानंतरही निवडणुका घेता आल्या नव्हत्या. नियमानुसार, संबंधित मतदारसंघात किमान 75 टक्के मतदार उपलब्ध असणे आवश्यक असते. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्याने ही अट पूर्ण झाली असून आता निवडणूक आयोगाकडून पुढील प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक पक्षांनी आतापासूनच रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. विधान परिषदेची एकूण सदस्यसंख्या 78 आहे. त्यापैकी 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून येतात. सध्या त्यातील 17 जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांवर निवडणुका झाल्यानंतर विधान परिषदेतील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. विशेषतः पावसाळी अधिवेशनापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण झाल्यास सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंना आपली ताकद वाढवण्याची संधी मिळणार आहे. ज्या मतदारसंघांमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे, त्यामध्ये अहिल्यानगर, सोलापूर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, परभणी-हिंगोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, छत्रपती संभाजीनगर-जालना आणि नागपूर या मतदारसंघांचा समावेश आहे. या सर्व मतदारसंघांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांतील सत्तासंतुलन लक्षात घेता प्रत्येक पक्षासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या पक्षांचे वर्चस्व आहे, त्यांना या निवडणुकांमध्ये मोठा फायदा होण्याची शक्यता मानली जात आहे. त्यामुळे उमेदवारीपासून ते मतदार व्यवस्थापनापर्यंत सर्व स्तरांवर हालचालींना वेग आला आहे. अनेक इच्छुक नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे संपर्क साधण्यास सुरुवात केली असून, काही ठिकाणी उमेदवारीवरून अंतर्गत स्पर्धाही वाढताना दिसत आहे. लढत अत्यंत चुरशीची ठरणार पावसाळी अधिवेशनाआधी विधान परिषदेत नव्या सदस्यांची भर पडल्यास राज्यातील राजकीय चित्र बदलू शकते. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निकालांचा थेट परिणाम या निवडणुकांवर होणार असल्याने सर्वांचे लक्ष आता निवडणूक आयोगाच्या घोषणेकडे लागले आहे. पुढील आठवड्यात कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या हालचालींना सुरुवात होणार असून, विधान परिषदेच्या या 17 जागांसाठीची लढत अत्यंत चुरशीची ठरणार, हे निश्चित मानले जात आहे.
